WHAT’s happening

शिवजयंती उत्सव - सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव शोभायात्रा

शिवजयंती उत्सव - सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव शोभायात्रा

हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची तृष्णा शिवप्रभूंनी महाराष्ट्राला दिली. त्यासाठी स्वप्राणांची आहुती अनेकांनी दिली. धर्माचे रक्षण केले. त्यातून हिंदवी साम्राज्य उभे केले. पुढे पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी अनेकांनी शिवरायांकडून प्रेरणा घेऊन कार्य केले. सैन्यदलातील ‘मराठा रेजिमेंट’ व नौदलाचे झेंड्यावरील चिन्ह सैनिकांना धैर्य प्रदान करते. आजही महाराष्ट्रातल्या घराघराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. मुलांना लहानपणापासून शिव शौर्यगाथा ऐकवल्या जातात. शिवरायांचे गड कोट आजही इथे सशक्त मनगटे व दुर्दम्य इच्छाशक्ती घडवत असतात. युगप्रवर्तक व स्वातंत्रसूर्य श्री शिवप्रभू यांच्या चरणांशी आपण समस्त भारतीय कायम नतमस्तक आहेत.

श्री शिवप्रभूंनी केलेले धर्माचे रक्षण, स्वराज्य स्थापना आणि कुशल राज्य प्रशासन हे आजच्या भारताचा नैतिक पाया आहे. स्वराज्य स्थापनेच्या धामधुमीतही शिवरायांचे स्वराज्यातील अंतर्गत प्रशासनाकडे संपूर्ण लक्ष होते. शिवरायांनी घेतलेली पर्यावरणाची काळजी राज्यकारभारात दिसून येते.

शिवकाळात बांधले गेलेले गड मजबूत आणि टिकाऊ असल्याने इमारत पुनर्बांधणीसाठी होणारा खर्च, वेळेचा अपव्यय तसेच नैसर्गिक साधन संपत्ती सामग्रीचा अतिरिक्त वापर टाळला गेला.भोवतालच्या निसर्गापासून किल्ल्यांचं रक्षण करताना कुठेही निसर्गावर अतिक्रमण केलेले नाही.रायगडावर दरबारात महाराजांचे हळू आवाजातील बोलणे राजदरबारातील प्रत्येक व्यक्तीला ऐकू जाईल अशी सोय केली होती. त्यासाठी विजेची उपकरणं नव्हती. प्रतिध्वनी व हवेची दिशा यांचा वापर करून राजदरबारात निसर्गाला अनुकूल अशी ध्वनिनिर्मिती केली. 

गडांवर पाण्यासाठी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी साठवण्याची ठिकाणे खूप होती.महाराजांनी त्यांच्या काळात जेवढी तळी, टाकी खोदली ती जगात कुठल्याही शासकाने एवढ्या कमी कालावधीमध्ये खोदलेली नाहीत. या व्यतिरिक्त गडांवर सांडपाण्याची, शौचकुपांची व्यवस्था होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निरनिराळ्या आज्ञापत्रात ‘गडाचे पाणी बहु जतन राखावे’, ‘झाडे गडावरी लावावी,जतन करावी.’ असे आदेश पाहावयास मिळतात. तेल, गवत, लाकूडफाटा, सरपण याची अजिबात नासाडी होता कामा नये म्हणून महाराजांनी कडक शब्दात लिहिले आहे.

 याशिवाय पर्यावरणाचा संरक्षणासाठी केलेला भरपूर उपयोग आपल्याला शिवचरित्रात दिसून येतो. तसेच आयुर्वेदाचा उपयोग दिसून येतो. जखमी सैनिकांना विनाविलंब औषध उपचार मिळावेत म्हणून गडावरती सगळीकडे निरगुडीची झाडे, बाभळीची झाडे व हळदीची रोपे लावलेली असत. शिवाय जुने तूप साठवलेल्या तुपाच्या विहिरी असत. दुष्काळात महाराजांनी आरगडी नावाची ज्वारी व राजमा घेवडा ही कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी बियाणे रयतेला दिली. निसर्गाबरोबरचे सहजीवन स्वराज्याच्या शासनव्यवस्थेचे शिवरायांनी आखून दिलेले वैशिष्ट्य होते. 

आताच्या काळात शिवरायांची ही शिकवण आपण आचरणात आणण्याची गरज आहे. आज आपल्याला आपणच तयार केलेल्या प्रदूषणरुपी शत्रू बरोबर लढायचे आहे. निसर्ग टिकला तर आपलं संरक्षण आपोआप होईल. त्यासाठी श्री शिवप्रभुंची दूरदृष्टी घेऊन शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे.

यंदाच्या शिवजयंतीच्या योगावर ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ च्या निमित्ताने आपण शिवचरित्रातील ही प्रेरणा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. त्यासाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक कोल्हापूर शहरात १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. श्री सिद्धगिरी मठ येथे २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पंचमहाभूत लोकोत्सवाचा हा पूर्व संध्या सोहळा असेल.

डोळ्यांचे पारणे फेडणारा पश्चिम महाराष्ट्रातील भव्य शिवजयंती सोहळा 2023

शोभायात्रेची सुरवात शिवरायांना मानवंदना देऊन होईल. ही शोभायात्रा भारताच्या सांस्कृतिक कलावैभवाचे दर्शन घडवणारी असेल. शिवप्रभूंच्या मूर्ती घेऊन मिरवणाऱ्या ८ ते १० कोकणी पालख्या असतील. पारंपरिक कोकणी पद्धतीने होळीला देव नाचवतात तसा शिवप्रभूंच्या पालख्या नाचवण्याचा खेळ होईल. तुतारींच्या व ढोल ताशांच्या गर्जनेत पालखीची दिमाखदार सुरवात होईल. सनई -चौघडे, एकतारी इत्यादी मंगल वाद्यांच्या सुरावटी आनंदमय वातावरण निर्माण करतील. यक्षगान करणारे दाक्षिणात्य कलाकार आपली सेवा महाराजांच्या चरणीं रुजू करतील. कोळी,बंजारा इत्यादी समाज आपल्या पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होतील. लेझीम व झांज पथके आपल्या नृत्याने मिरवणुकीत लय आणतील. कर्नाटकात जादूची बाहुली म्हणून ओळखले जाणारे ‘गारुडी गोंबे’ हा नृत्य प्रकार, कांगिल हे उडपी लोकनृत्य तसेच तित्तिराय,कोदेगलु इत्यादी नृत्यप्रकार आनंदाची उधळण करत शिवजन्मोत्सव साजरा करतील. तर वाघ नृत्य, मयुर नृत्य, आदिवासी नृत्य, बेडरवेश नृत्य, कंबड नृत्य, कावडी नृत्य, फुगडी नृत्य उत्साह शिगेला पोहचवतील.

गोंधळी आई भवानीचा उदो उदो म्हणत गोंधळ मांडतील तर जोगती शिवरायांच्या नावाने जोगवा मागतील. पोतराज , पिंगळा ज्योतिषी  आपापली कला दाखवतील. दांडपट्टा, वीरागसे, पुजाकुनीत, असे वीररस पूर्ण खेळ मिरवणुकीत मावळ्यांचा जोश आणतील. 
या शोभायात्रेत कोल्हापूर शहरातील शिव मंडळे एकत्र येऊन सामायिक रित्या शिवजयंती साजरी करतील.

ही शोभायात्रा १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता गांधी मैदान येथे सुरु होऊन कोल्हापूर शहरात फिरून ६ वाजता पंचगंगेच्या घाटावर पोहचेल. मग माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्तिथीत पंचगंगा नदीची सामूहिक आरती होईल व या शोभायात्रेची सांगता होईल.