Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवराय आणि पर्यावरण

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य कालातीत आहे. श्री शिवप्रभूंनी केलेले धर्माचे रक्षण, हिंदवी स्वराज्य स्थापना आणि कुशल राज्य प्रशासन हे आजच्या भारताचा नैतिक पाया आहे. स्वराज्य स्थापनेच्या धामधुमीतही शिवरायांचे स्वराज्यातील अंतर्गत प्रशासनाकडे संपूर्ण लक्ष होते. स्वराज्यबांधणी शाश्वत तत्वावर आधारित असेल याची काळजी त्यांनी घेतली होती. स्वराज्यातील विकास कार्ये ही दीर्घकाळ टिकणारी व निसर्गाला पूरक होती. शिवकाळात पर्यावरण हा शब्द जरी प्रचलित नसला तरी माणसं निसर्गाशी समरस होणारी होती. झाडं, पशू, पक्षी, प्राणी, व नद्या यांची काळजी घेतली जात होती. शिवरायांनी घेतलेली अशी पर्यावरणाची काळजी राज्यकारभारात दिसून येते.

छत्रपती शिवराय आणि पर्यावरण

“सुंदरता, गुरुता, प्रभुता भनि भूषन होत है आदर जामें । सज्जनता औ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में।
दान कृपानहु को करिबो करिबो अभै दीनन को बर- जामें । साहस सों रनटेक बिबेक इते गुन एक सिवा सरजा में ।। ”

कवी भूषण म्हणतात की, श्री शिवाजीच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व सदगुणांचा समावेश आहे. शरीरात व स्वभावात सौंदर्य असून, महत्ता, प्रभुता आदी गुण असल्यामुळे त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो. त्यांच्या ठिकाणी असलेली सज्जनता, दयाळूपणा, नम्रता, आणि कोमलता केवळ त्यांच्या स्वभावातच नव्हे, तर त्यांच्या प्रजाजनात देखील दिसून येते. श्री शिवाजी दान देण्यात व तलवार चालविण्यात निपुण आहेत. तसेच दीन-दुर्बळ जनांना आधार देण्यात समर्थ आहेत. साहस, युद्ध- नीती आणि विवेक विचार इतके हे सदगुण एका शूर शिवाजी राजामध्ये विद्यमान आहेत.

शिवकालीन गड किल्ले

शिवकाळात बांधले गेलेले गड मजबूत आणि टिकाऊ असल्याने इमारत पुनर्बांधणीसाठी होणारा खर्च, वेळेचा अपव्यय तसेच नैसर्गिक साधन संपत्ती सामग्रीचा अतिरिक्त वापर टाळला गेला. सिंधुदुर्ग, खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग या जलदुर्गांची बांधणीत विविध क्लुप्त्या योजून बांधकामाला लाटांच्या तडाख्या पासून वाचवले. कुलाबा (अलिबाग) किल्ल्यात लाटांचा तडाखा कमी करण्यासाठी या बांधकामात दगडी चिऱ्यांमधील भागात चुन्याचा वापरच केला नाही. तेथे पोकळी निर्माण होऊन, लाटेचे पाणी त्या पट्टीमध्ये शिरून लाटांचा तडाखा कमी झाला की पर्यायाने किल्ल्याच्या बांधकामाचे आयुष्य वाढले. पद्मदुर्गावर दगडापेक्षाही भक्कम चुना व इतर गोष्टींचा वापर केलेला दिसतो. खान्देरी व सिंधुदुर्ग भोवतालच्या समुद्रात लहान-मोठे, ओबड - धोबड खडक टाकले. लाटांचा वेग त्याने बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शत्रूच्या बोटी त्या खडकांवर आपटून आपोआपच संरक्षण मिळायचे. तसेच या दगडांवर वाढलेल्या कालव्यांच्या धारदार कडा मुळे त्या खडकांवर वावरणे अशक्य होऊन बसते. भोवतालच्या निसर्गापासून किल्ल्यांचं रक्षण करताना कुठेही निसर्गावर अतिक्रमण केलेले नाही.

बांधकामासाठी खडक फोडण्याचे तंत्र हे निसर्गपूरक होते. सर्वात जास्त किल्ले महाराष्ट्रात बांधले गेले. सहाजिकच मोठ्या मोठ्या मशीनरी न वापरता मोठाले खडक फोडण्याचे, दगड तोडण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. शिळांभोवती आग लावून ती तापवत असत. मोरब्याचे भस्म व काळ्या तिळाचे भस्म पाण्यात घालून चांगले कालवावे व कढवावे. रसरशीत तापलेल्या शिळेवर हे कालवण पाणी शिंपडावे त्याने शिळा फुटतात. किंवा भर उन्हात चुन्याचे पाणी तप्त शिळेवर मारावे म्हणजे शिळा फुटते.

महाराजांचे पाणी अभियांत्रिकी कौशल्य अभ्यास करण्याजोगे आहे. अगोदर महाराज पाण्याची पाहणी करत आणि पाणी असेल तिथेच किल्ला बांधला गेला पाहिजे हा महाराजांचा कटाक्ष होता. म्हणून कुठलेही मशीन नसताना जलसाठे आणि भूगर्भातील पाणी कसे शोधले अभ्यासण्यासारखे आहे. पाणी शोधण्यासाठी प्राचीन ग्रंथातील सहज ठोकताळे महाराजांनी वापरले. ज्यामध्ये वेत, बोरू, रुई, मांदार, उंबर, जांभूळ, निर्गुंडी चे झाड ज्या जमिनीत दिसून येतात, तिथल्या जमिनीत पाण्याची तिथल्या जमिनीत उपलब्धता आढळते. मोहाचे झाड, ताडाचे झाड, करंज वृक्ष, बहावा किंवा कांचन वृक्ष, गवताचे बेट इत्यादी वृक्षांच्या जवळपास वारुळाची उपलब्धता असेल तर त्या ठिकाणी जमिनीच्या खाली पाणी उपलब्ध असते, असा एक कयास आहे. एखाद्या ठिकाणी कुठे आधी काटेरी झाडांच्या जागेत पळस, बिन काटेरी झाड असेल किंवा याच्या उलट पळस आदी वृक्षांच्या मध्ये जर काटेरी झाड उगवले असेल तर अशा ठिकाणी वीस फुटांवर पाणी लागते आणि जर पाणी नाही तर खनिज संपत्तीचा शोध लागतो.

जल व्यवस्थापन

खोदकाम केलेल्या ठिकाणी जर मचूळ पाणी लागल तर त्यात अर्जुन, सादडयाची फळ, धोतऱ्याची फळ, सागरमोथा,आवळकाठी चांदवेल आणि वाळा या सर्वांचे मिश्रण करून ते त्या विहिरीच्या टाक्यांम ध्ये टाकायचे म्हणजे ते पाणी स्वच्छ निर्मळ होई. टाक्याची पूर्व-पश्चिम बाजू लांब असायची आणि दक्षिण-उत्तर बाजू आखूड ठेवायचे. या सगळ्या टाक्या पाण्याच्या आयताकृती असतात. यातही दिशेचा गुरुत्वाकर्षण आणि इतर बाबींचा बारीकसारीक विचार केलेला दिसतो. विहिरी व टाकी यांचे पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी त्या वेळी शेवग्याच्या शेंगाची बारीक पावडर करून ती पाण्यात टाकले जाई. त्यामुळे तळी आणि विहिरी टाकी यातील पाणी साठा किती वर्ष तसाच राहिला तर किडे पडत नसत आणि ते पाणी वापरण्यासाठी निरुपयोगी होत नसे.

या व्यतिरिक्त गडांवर सांडपाण्याची, शौचकुपांची व्यवस्था होती. आजही रायगडावर त्या काळातील शौचकूप (संडास) पाहायला मिळतात. रायगडाच्या राणी निवासामध्ये व बुरुजावर ती आजही पाहायला मिळतात.

पर्यावरण व्यवस्थापन

रायगडावर विद्युत ऊर्जेची सोय नसताना, प्रतिध्वनी तंत्रज्ञान आणि वायू व्यवस्थापनाचा वापर करून राजदरबारात निसर्गाला अनुकूल अशी ध्वनिनिर्मिती केली. महाराजांचे नेहमीच्या आवाजातील बोलणे राजदरबारातील प्रत्येक व्यक्तीला ऐकू जाईल अशी सोय केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निरनिराळ्या आज्ञापत्रात गडकिल्ल्यांवरील झाडी मुद्दामहून राखण्याचे आदेश पाहावयास मिळतात. ‘गडांवर झाडें, आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष व निंबे, आदिकरून लाहान वृक्ष , तैसेचि पुष्पवृक्ष, वल्ली, किंबहुना प्रायोजक-अप्रयोजक जें झाड होत असेल तें गडावरी लावावे; जतन करावें’ अशी आज्ञापत्रे पाहावयास मिळतात. दुष्काळात महाराजांनी आरगडी नावाची ज्वारी व राजमा घेवडा ही कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी बियाणे रयतेला दिली.

याशिवाय पर्यावरणाचा संरक्षणासाठी केलेला भरपूर उपयोग आपल्याला शिवचरित्रात दिसून येतो. अफ़जल खानभेट असो किंवा पन्हाळ्याहून सुटका; निसर्गाने शिवाजी राजांना साथ दिली होती. यामुळेच रायगड बांधणीत शिवराय भोवतालचे जंगल दाट करण्याचे आदेश देतात. राजगडाला दोन नद्यांचे संरक्षण आहे. संरक्षणात आयुर्वेदाचा उपयोग दिसून येतो. जखमी सैनिकांना विनाविलंब औषध उपचार मिळावेत म्हणून गडावरती सगळीकडे निरगुडीची झाडे, बाभळीची झाडे व हळदीची रोपे लावलेली असत. शिवाय जुने तूप साठवलेल्या तुपाच्या विहिरी असत. निसर्गाबरोबरचे सहजीवन स्वराज्याच्या शासनव्यवस्थेचे शिवरायांनी आखून दिलेले वैशिष्ट्य होते.

आताच्या काळात शिवरायांची ही शिकवण आपण आचरणात आणण्याची गरज आहे. आज आपल्याला आपणच तयार केलेल्या प्रदूषणरुपी शत्रू बरोबर लढायचे आहे. निसर्ग टिकला तर आपलं संरक्षण आपोआप होईल. त्यासाठी श्री शिवप्रभुंची दूरदृष्टी घेऊन शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे. हीच शिवजयंती दिनाच्या दिवशी त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरेल. जय शिवराय!