PrachinJeevan

Prachin Jeevan

प्राचीन जीवन दर्शनी

सर्व प्राचीन संस्कृतींप्रमाणेच भारतीय संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. प्राचीन मानव तंत्रज्ञानाच्या शोधाच्या अनेक सहस्रकं आधी सर्वस्वी निसर्गावर अवलंबून होता. त्यातूनच मानवी समाजातील संस्कृती, श्रद्धा, आहार, आचारविषयक रीती या संबंधित देश, काळानुसार वेगवेगळ्या अंगांनी विकसित झाल्या. पर्यावरण ही संकल्पना विसाव्या शतकाच्या मध्यात वाढलेले प्रदूषण, त्यातून बिघडत चाललेला पर्यावरणाचा समतोल इत्यादी घटनांच्या अनुषंगाने विकसित झाली.

भारतीय संस्कृती पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावते. माणूस आणि निसर्ग यांच्यात एक वैज्ञानिक व संतुलित असे अतूट नाते निर्माण झाले आहे.आपल्या धर्मग्रंथात झाडे, वनस्पती, फुले, पर्वत, धबधबे, प्राणी, पक्षी, वन्य प्राणी, नद्या, तलाव, जंगले, माती, दऱ्या, अगदी दगडही पूजनीय आहेत आणि त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर सांगितला आहे.

भारतीय प्राचीन जीवनदर्शन पाहता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे निसर्गात राहताना निसर्गाशी मैत्री करून त्याच्यावर कुठलेही प्रकारचे दुष्परिणाम न होता त्याला वृद्धिंगत करून सहयोगाने आणि एकोप्याने जगण्याची एक कला आपल्या प्राचीन भारतीयांनी कृतज्ञतेने आणि हुशारीने अंगीकारली. यात वस्त्र, खाद्य, शस्त्र, शास्त्र, सण, परंपरा, कला या सर्व क्षेत्रांमध्ये निसर्गाला अथवा पर्यावरणाला अनुकूल अशा प्रकारचे वर्तन प्रत्येक भारतीयाकडून सहजपणे होताना दिसते. प्रत्येक परंपरेला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्याला श्रद्धेची जोड देऊन वर्षानुवर्ष निसर्गाला अनुकूल अशा चालीरीती जपून ठेवयात त्यांनी यश मिळवले.

वस्त्र संस्कृती

प्राचीन भारतातील लोकांच्या वस्त्रांचा विचार करूया. वस्त्रांची निर्मिती कपाशीपासून केली जात असे आणि या कपाशीला सेंद्रिय पद्धतीने तयार करून तिला धाग्यामध्ये रूपांतरीत केले जाई. हे धागे एकमेकांमध्ये ओवून चरख्याच्या माध्यमातून प्रत्येक घरातून वस्त्र निर्मिती होत असे. आपली भारतीय परंपरा लोकांना स्वतःचे वस्त्र स्वतः बनवण्यास प्रवृत्त करत होती. त्यातून श्रमाधिष्ठीत स्वावलंबी समाज घडला. धागे तयार झाल्यानंतर त्यानंतर प्रक्रिया करण्यासाठी त्याचा रंग बदलण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जाईल. यामध्ये हळद, पलाश, जांभूळ इत्यादी नैसर्गिक पदार्थ वापरले जात. त्यामुळे आजकालच्या रसायनपूर्ण रंग आणि शाईमुळे होणारे प्रदुषण कधीच होत नव्हते. कपाळी वापरला जाणारा गंध, कुंकू, हळद देखील नैसर्गिक संसाधनांपासूनच तयार करण्याची पद्धत आमच्यात होती.

रांगोळी

दररोज प्रत्येक गृहाच्या बाहेर स्वच्छता झाल्यानंतर रांगोळी काढण्यात येत असे. ही रांगोळी धान्याने काढली जाई. कृमी कीटक आणि पक्षी यांना हेच धान्य खाद्य म्हणून उपलब्ध होत असेल खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती.

अग्निहोत्र

सकाळी आणि सायंकाळी अग्निहोत्र करण्याची पद्धत आमच्या मुलांना शिकवली जात होती. ज्यामध्ये तांब्याच्या यज्ञकुंडात देशी गाईची शेणी, तांदूळ, कापूर यांच्या मदतीने अग्नी प्रज्वलित करून त्यात विविध वनस्पतींच्या समिधा वाहिल्या जात. यातून निर्माण होणारा अग्नी आणि वायू वातावरणातील प्रदूषण कमी करून वायूला समृद्ध करण्याचे काम करतो. अग्निहोत्राद्वारे पर्जन्याला आवाहन केले जात असे. निरंतर अग्निहोत्र ज्या ठिकाणी होत राहते त्या ठिकाणचे वातावरण सद्विचारांना, सत्कार्यांना आणि चांगल्या मनोवृत्तीला प्रोत्साहित करते. यातून तयार होणारी चिमुटभर राख रात्री पाण्यात मिसळली असता पाण्याचे शुद्धीकरण होत जाते. हीच राख ज्या वेळेला झाडाझुडपांना पाण्याद्वारे सोडली जाते तेथील कृमी कीटक कमी होण्यास मदत होते आणि मातीचा नैसर्गिक पोत सुधारण्यास मदत होते.

स्वच्छता

घरामध्ये वापरली जाणारी झाडू ही नारळाच्या झाडांपासून बनवली जायची. घरामध्ये असणारी जेवणाची भांडी ही सुद्धा मातीपासून बनलेली असायची. ही मातीची भांडी घासायला लागणारी किशी हे नारळापासून बनवलेली असायची. ही मातीची भांडी राखेनेच घासली जायची त्यासाठी वेगळी रसायन युक्त पावडर वापरली जात नसेल. सकाळच्या स्नानासाठी वापरण्यात येणाऱ्या साबण हा त्या त्या प्रदेशातील विविध प्रकारची माती, ज्वारी, बाजरीचे पीठ आणि दूध यापासून बनवला जाई. अभंग तेलाने मर्दन केलं जात असे हे तेलही पूर्णपणे नैसर्गिक असे. यासर्वांमुळे आसपासचा परिसर शुद्ध आणि रसायन विरहित राहत असे.

पाणवठा

घरातले पाणी भरण्यासाठी गावात एक पाणवठा असे. त्या ठिकाणी गावातील महिला आणि लहान मुलं पाणी भरण्यासाठी एकत्र येत असत. त्यांची पाणी साठवण्याची भांडी सुद्धा तांब्या,पितळेची, मातीचे आणि लोखंडाची असायची याचमुळे परस्परांची सुख दुख: वाटून घ्यायची एक खास जागा म्हणजे गावातील पाणवठा असायचा.

सण उत्सवांमध्ये वाजवली जाणारी वाद्य

हलगी, शंख, थाळीवादन,मोठी हलगी वादन, ताशा, मडकी वादन, वीणा वादन, झांज वादन, तुतारी वादन, बासरी वादन, संबळ वादन, तुणतुणं, वाजंत्री, पुंगी या आणि अनेक अशा वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून सण उत्सवांमध्ये उत्साह वाढवण्याची भारतीयांची परंपरा आहे. वातावरण मंत्रमुग्ध करून प्रत्येक सण हा आनंद वर्धिष्णू करणारा बनवणे ही भारतीयांची कला. या वाद्यांमधून उमटणारे सूर ताल पंचक्रोशीला आनंददायी बनवतात. शिवाय ही वाद्य घडवण्यासाठी वापरली जाणारी सगळी संसाधन ही निसर्गनिर्मित आहेत शिवाय वाद्य वापरून जीर्ण झाल्यानंतर ती मोडकळीला येतात त्यावेळेला सुद्धा ही निसर्गाचा ऱ्हास कुठल्याच पद्धतीने करत नाहीत.

गुरुकुल पद्धती

भारतीय प्राचीन शिक्षण पद्धती ही गुरुकुल आधारित होती. यामध्ये मुलांना त्यांच्या गुरूंच्या जवळ बारा वर्षे घरापासून दूर अभ्यास करण्यासाठी आणि १४ विद्या व ६४ कला शिकण्यासाठी पाठवले जाई. यामध्ये नुसत्या भौतिक जगताला आवश्यक असणाऱ्या कला नव्हे तर अध्यात्माच्या दृष्टीने आवश्यक अशा जीवन विद्या सुद्धा त्याला शिकवल्या जाई.

मुलांवर सर्वप्रथम कुठला संस्कार केला जात असेल तर तो श्रमदानाचा. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कमीत कमी उपलब्ध साधन संपत्ती मध्ये निसर्गाशी जुळवून घेऊन राहण्याची कला मुलांना लहानपणापासून शिकवली जात असे. मुलांमध्ये नम्रतेची भावना निर्माण करण्यासाठी सेवाभाव वृद्धिंगत होण्यासाठी, कष्टाची कामे सर्वात जास्त केली जात आणि त्यानंतरच अक्षर अभ्यासाला सुरुवात केली जात असे. या कष्टाच्या कामांमध्ये लाकूडफाटा गोळा करणे, गोळा केलेला लाकूड फाटा कुऱ्हाडीने तोडून सरपणाची तयारी करणे, शेणाने गुरुकुल सारवणे, नदीवरून पाणी वाहून आणून पिण्याचे पाण्याची सोय करणे, गुरुकुलातील गोधन जपणे आणि वृद्धिंगत करणे, गुरुकुलासाठी लागणारे अन्नधान्य शेतीच्या माध्यमातून स्वतः तयार करणे इत्यादी क्रियाकलाप यांचा समावेश होतो.

अक्षर अभ्यासामध्ये वेदोक्त शिक्षण या चार वेद, १८ पुराण, उपनिषद सहा शास्त्र, नीतीशास्त्र इत्यादी अभ्यासक्रम शिकवला जाई. बहुतांश विद्यार्थी आणि स्मृती या मार्गाने होईल त्यामुळे वह्या पुस्तक यांची गरज लागत नसेल त्यामुळे निसर्गतः पुस्तक बनण्यासाठी लागणारी लाकूडतोड अनुषंगाने कमी होई.

या गुरुकुलात १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जाई. घरकुलात शिकवली जाणारी वाद्य खालीलप्रमाणे:

तबला

तबला हे वाद्य चर्मवाद्य आहे. बहुतांश अभंग, गीत, शास्त्रीय गायन हे तबल्याविना अपुरे आहे. यातून निर्माण होणारा नाद हा वायूमुळे सर्वांपर्यंत पोहोचतो आणि या वाद्याला उत्कृष्ट पद्धतीने वाजवण्यासाठी अग्नीचा वापर करता येतो. त्यामुळे पृथ्वी, वायू आणि अग्नी महाभूतांचा स्वरूप या चर्मवाद्यांमध्ये सापडते.

दिमडी

दिमडी बहुतांश लावणी नृत्यंमध्ये अभंग मालिकेमध्ये नावाचे चर्मावाद्य वापरले जाते. यातही पृथ्वी, वायू आणि अग्नी हे समाविष्ट झालेले दिसते

तंबोरा

तंबोरा हे तंतुवाद्य असून पृथ्वी आणि वायूचे एकत्रित रूप यात समाविष्ट आहे. लाकूड भोपळा बनवला जातो वाद्य निर्मिती ही सुद्धा नैसर्गिक संसाधनांपासूनच बनवण्याची भारतीय संस्कृती आहे.

सतार

सतार हे तंतुवाद्य आहे

मृदंग

मृदंग अथवा पखवाज बहुतांश अभंग मृदंग अथवा पखवाजाशिवाय अधुरे आहे. हेही एक चर्मवाद्य आहे.

गायन

भारतीय गायन हे सप्तसुरांवर आधारलेला असून याला शास्त्रीय गायनाचा आधार आहे यामध्ये दंतव्य, ओष्टव्य, तालव्य, कंठव्य व्यंजनांचा त्यापासून बनणाऱ्या अक्षर आणि शब्दांचा, नऊ रागांचा आलाप इत्यादी च्या माध्यमातून अप्रतिम शास्त्रीय गायनाची निर्मिती होते यामुळे मनाचे समाधान तर आनंद वाटतोच त्याहीपेक्षा अशा प्रकारच्या गायनामुळे हृदय आणि घशासंबंधीचे विकार कायमस्वरूपी नाहीसे होतात.

वीणा

सरस्वतीचे आवडते वाद्य म्हणजे वीणा. काष्ठ, तंतू यांच्या माध्यमातून बनलेली ही वीणा फक्त बोटांच्या सहाय्याने तंतू वाजवून यातून स्वरांची निर्मिती केली जाते. एक अत्यंत पवित्र वाद्य आहे.

संबळ

संबळ - भारुड व गोंधळ अशा पवित्र कार्यांमध्ये संबळचा वापर केला जातो. बांबू काठ्या आणि चर्मवाद्य याचा वापर करून हे तयार केलेले संबळ वाद्य अत्यंत गतिमान ताल आणि ठेका धरण्यास प्रत्येक व्यक्तीला प्रवृत्त करते.

भारतीय वाद्य निर्मिती ही नैसर्गिक संसाधनातून केली जाते. त्यात कुठल्याही प्रकारची रसायने अथवा मानवनिर्मित वस्तूंचा समावेश नसल्याने त्यातून प्रदूषण तर दूरच राहिले. परंतु निर्माण होणारी सुर व ताल हे आल्हाददायी अशा संगीताला जन्म देते आणि प्रत्येक मनाचा ठाव घेते.

भारतीय नृत्य प्रकार

भरतनाट्यम्, कत्थक, कुचीपुडी भारतीय नृत्य प्रकार हा मुद्रा, भाव, कर आणि पद लालित्य यांच्या अनोख्या संगमातून जन्माला येणारे एक आनंददायी भावकृती आहे. काही नृत्य हे उत्साह वाढवणारे, बोधप्रद, दुखी भावनांना साद घालणारे, मनोरंजक अशा असंख्य भावभावनांनी मानवी मनाचा भाव विश्व व्यापक करून मनाला संवेदनशील बनवणारे नृत्यप्रकार भारतात जन्माला आले. भरत मुनी हे या नाट्यशास्त्राचे जनक होत.

योगाभ्यास

पतंजली ऋषींनी पूर्ण जगाला दिलेली अप्रतिम भेट म्हणजे पतंजली योगशास्त्र. त्याचप्रमाणे हठयोग हाही योगाचा एक प्रकार शरीर आणि मन यांच्या संयोगातून इंद्रिय निग्रह आणि मानवी जीवनाचे अंतिम साध्य साधण्यासाठी भारतीय योगअभ्यास अत्यंत मदत करते. अष्टांग योग ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आठ पायऱ्यांच्या मदतीने जीवाची शिवाशी भेट होण्यास मदत होते. यातही निसर्ग अनुकूल जीवन पद्धती आचरण्यास प्रवृत्त केले जाते.

भारतीय खेळ

भारतीय खेळ कुठलेही प्रकारच्या मानवनिर्मित संसाधनांचा वापर न करता खेळण्यात येत होते. बेचकी, कबड्डी, खो-खो, लंगडी, भोवरा व नेमबाजी इत्यादी खेळ दृष्टी एकाग्रता मनोरंजन या सर्वांचं एकत्रित आनंदाचा आस्वाद देणारे हे कायम पर्यावरण पूरक असेच खेळ भारतीय संस्कृतीत केले जात असत.

भारतीय ज्योतिष शास्त्र

खगोल विज्ञान अवकाश चंद्र आणि सूर्याचे परिभ्रमण आणि परिवलन नक्षत्र तारे यांची गती आणि मार्गक्रमण यांच्या सखोल अभ्यासातून ज्योतिष शास्त्र जन्माला आले. ग्रह आणि तारे यांचा आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो, ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते आणि अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या अनुपस्थितीमुळे ओहोटी सुरू होते, त्याचप्रमाणे आपले शरीर तर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्येला माणसाचे भाव उत्कट झालेले असतात. पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायानुसार ब्रह्मांडातील असंख्य घटनांचा या पिंडाच्या अस्तित्वावर परिणाम होत असतो. याचाच अभ्यास करून आपल्या पूर्वजांनी ज्योतिष शास्त्राची निर्मिती केली. हे शास्त्र सहा शास्त्रांपैकी एक आहे. यातून जन्म जीवन आणि मृत्यू याबद्दल अचूक भाष्य करता येते. आपल्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान आधारित ज्योतिषशास्त्र शिकवण्याची कला वर्षानुवर्षे शिकवली जात होती.

भारतीय गुरुकुल शिक्षणातील ६४ कला

स्थापत्यशास्त्र

शिळा आणि मातीची घरे, मंदिरे, वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या, इत्यादी घडवताना सर्व नैसर्गिक संसाधनातून वेगवेगळे स्थापत्यशास्त्र अनोख्या आविष्कारांना भारतीय संस्कृतीने जन्म दिला. यात वेरूळच्या लेण्या, कैलास मंदिर असे अप्रतिम आसेतु हिमाचल बांधण्यात आलेली मंदिरे, मोहनजोदडो, हम्पी सारखी नगर रचना इत्यादी स्थापत्य शास्त्रातील विविध अजब प्रयोगांचा समावेश होतो. मातीची घर बांधत असताना त्यात माती, वीट, चुना, बांबू इत्यादी गोष्टींचा वापर घर बांधण्यासाठी केला जात असे. झोपड्या बांधताना लाकडं, झावळ्या आणि मातीने लिंपून कुडाच्या व मातीच्या झोपड्या घडवण्यात येत असत. त्या काळात बांधली गेलेली मातीची घर ही शंभर दीडशे दोनशे वर्षांपर्यंत टिकायची. आज जिथे आपण सिमेंटची घराबाहेर ज्यांचं सरासरी आयुष्य ५० ते ६० वर्षे असतात ते आपल्याला जुन्या घरांच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. बांधकामांमध्ये सिमेंटच्या ऐवजी चुन्याचा वापर केला जाईल त्यामुळे प्रत्येक बांधकाम हे प्रचंड मजबूत असे.

शिल्पकला

वेगवेगळे पाषाण, काळा शिळा आणि कधी कधी तर मोठाले पाषाणापासून डोंगर हे भारतीयांनी शून्य आणि हातोडीच्या मदतीने खोदून त्यातून वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती, स्तूप, मंदिरा जेवण्यासाठी लागणारा पाटा, वरवंटा, खलबत्ता, दगडी रांजण इत्यादी गोष्टी तयार केल्या हे काम अत्यंत एकाग्रतेचे संयमाचे त्यामुळे यातून तयार होणारी कलाकृती ही तितकीच अजरामर होत असे याचाही विचार केल्या तर कुठेही निसर्गात वाईट रसायन न सोडता प्रदूषण कधीच होणार नाही याची खात्री भारतीयांनी घेतली.

माती काम

भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात विविध प्रकारची माती उपलब्ध आहे. यामध्ये कोकणातील लाल माती, वाळू , शाडूची माती, चिकट माती, दख्खन पठारावरची काळी माती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माती भारतामध्ये सापडतात. या मातीच्या साह्याने दिवसभरात लागणाऱ्या बऱ्याच उपजीविकेच्या साधनांना घडवण्यात येते. यामध्ये जेवणासाठी लागणारी मातीची भांडी, रांजण, मडकी, मातीचे दिवे, चूल, लहान मुलांची खेळणी या सर्व गोष्टी मातीपासूनच बनवल्या जात असत आणि त्यामुळे कुठल्याही मानवनिर्मित घटकांचा यात समावेश नसल्याने पर्यावरण कधीच यामुळे दूषित झाले नाही.

धातू काम

नागार्जुन सारखे शास्त्रज्ञ याच मातीने जन्माला घातले हे रस शास्त्रज्ञ यांनी जमिनीपासून खनिजापासून धातू वेगळे करायची कला भारताला दिली. पारा हा विशिष्ट प्रकारचा धातू आपल्याकडेच तयार करण्यात आला. त्या काळात पाण्याची साठवण करण्यासाठी लागणारी भांडी पितळेची, तांब्याची जेवणाची भांडी पितलेची, देवाच्या मुर्त्या पितळेच्या अथवा सोन्याच्या, अंगावर धारण करण्याची आभूषण सोन्याची, तराजू पितळेचा इत्यादी गोष्टी या धातूच्याच बनवल्या जात असत.

लोहारी बहुतांश आयुध शस्त्र अस्त्र ही लोखंडापासून तयार केली जात असत. शेती विषयक लागणारी अवजार जसे बिया उर्फ कुदळ, पावडा, कुऱ्हाडी, नांगर, हातोडी, इत्यादी वस्तू ही लोखंडापासून तयार केले जात होत्या. तलवार, भाला, गदा इत्यादी शस्त्र लोखंडापासूनच तयार केले जात होते. लोहाराचा भाता हाही चामड्यापासून बनवला जातो. त्याची भट्टी ही लोखंडापासून बनते. त्यासाठी लागणारा कोळसा हा सुद्धा नैसर्गिक संसाधनाचा एक भाग आहे. त्यामुळे लोखंड काम तयार करत असताना त्यातून कुठल्याही प्रकारची केमिकल किंवा रसायनाची निर्मिती होत नव्हती आणि त्यामुळे लोहारी सुद्धा पर्यावरण पूरक होती.

चर्मकर्म

वैदिक काळामध्ये चर्मकार हे अत्यंत श्रीमंत असत. गावामध्ये चर्मकारांना आद्य मान असे. विधी कुठलाही असला मग ते शुभकार्य असो वा आशुभकार्य त्यामध्ये चर्मकाराचं विजोड असं महत्त्व असे. त्या काळात चामडे कमावण्यासाठी एखादं जनावर गतप्राण झाल्यानंतरच त्या जनावराची चामडी सोलून कातडी कमावली जात असे. ते चामड पाण्यामध्ये बरेच दिवस भिजवून त्याला नरम करण्यात येत असे. कमावलेलं कातडं त्यानंतर चपला बनवण्यासाठी, पिशव्या बनवण्यासाठी, पाणी काढण्याची मोट, पखाल, घुंगर पट्टी, चामड्याचा पट्टा, युद्धासाठी लागणारी चर्म वस्त्र इत्यादी बनवण्यासाठी या चामड्याचा वापर होत असे. हे चामडे जनावरांची हत्या करून नाही तर जनावर गतप्राण झाल्यानंतर त्यापासून कमावलं जात असे. त्यामुळे पुरवठ्याच्या मानाने मागणी अधिक होती. त्यामुळे चर्मकार कायम श्रीमंत बनत गेला. ही सर्व कारागिरी पर्यावरणपूरक होती.

पुष्प कर्म

निसर्गातून बहुप्रमाणात उपलब्ध असणाऱ्या विविध जाती प्रजातींच्या सुवासिक आणि सुंदर अशा फुलांपासून हार बनवणे, वेणी बनवणे, गजरा, बाशिंग, लग्नासाठी लागणार्या मुंडावळ्या, अंत्येष्टीसाठी लागणारी फुलांची आरास, घराला सजवण्यासाठी लागणारे माळा, मंदिर सजवण्यासाठी लागणारी फुलांची आरास, त्याचप्रमाणे बाळंतपणाच्या वेळेला गर्भवती स्त्रीला सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध पुष्प माला असे एक ना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुष्प; आरास बनवण्याची कला भारतीयांना पूर्वापर अवगत आहे आणि हे बनवत असताना कुठल्याही प्रकारच्या मानवनिर्मित संसाधनांना स्पर्श न करता पर्यावरण पूरक असे पुष्पकर्माचे विविध प्रकार त्या काळी अस्तित्वात होते.

बांबूपासून वस्तू निर्मिती

बांबूची बेट वाढवून, त्याच्या पट्ट्या काढून, त्या पट्ट्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या परडी, बुट्टी, भाकरी ठेवण्यासाठी बुट्टी, छोट्या-मोठ्या घराची तरटी, धान्य साठवण्यासाठी गोदाम साठवण, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या वेगवेगळ्या पट्ट्या, सोफे, खुर्च्या, शोभेच्या वस्तू त्याचप्रमाणे काही वाद्य उदाहरणार्थ बासरी, बांबूचे पडदे, जेवणासाठी लागणाऱ्या वाट्या, ग्लास, बांबू पासून बनवायचे दंड इत्यादी वस्तू पूर्वापार भारतामध्ये बनवण्यात येत आहेत. बांबू ही एक अशी वनस्पती आहे की जी जमिनीत मिसळली असता त्यापासून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही हे. बांबू पासून वस्तूनिर्मिती सुद्धा तितकेच पर्यावरण पूरक होते.

वैद्यकशास्त्र

आयुर्वेद शास्त्र त्या काळात इतके प्रगत होते निसर्गात मिळणाऱ्या वनस्पती आणि इतर संसाधनांपासूनच वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जात असत. यामध्ये ऋतू, पर्व, तिथी, शरीर प्रकृती याप्रमाणे उपचार केले जात. जळलेल्या माणसाची कातडी ही अत्यंत नाजूक असते. त्यावर माशा आणि इतर संसर्ग होण्याचा जास्त प्रादुर्भाव असतो.ते टाळण्यासाठी पूर्वीच्या काळात केळीच्या पानांना तूप लावून त्या व्यक्तीच्या जखमांवर केळीचे पान ठेवले जायचे. औषध उपचार करून जळलेल्या व्यक्तीला पण कुठल्याही प्रकारचा व्रण न राहता ती व्यक्ती बरी होत असे. अशा प्रकारची अद्ययावत वनस्पती पासून बनवलेली औषधे त्या काळात अस्तित्वात होती. आपल्या आयुर्वेद शास्त्र हे अत्यंत पर्यावरण पूरक आणि कुठल्याही प्रकारचा प्रदूषण पृथ्वी, वायू, आकाश या तत्त्वांमध्ये होऊ देत नाही आणि म्हणूनच आपली वैद्यकशास्त्र प्रणाली ही पंचमहाभूतांना पूरक होती.

युद्ध कला अथवा शस्त्रविद्या

प्राचीन गुरुकुल पद्धतीमध्ये लहानपणापासूनच अभिवाहकांना विविध प्रकारच्या युद्ध कला,शास्त्र कला शिकवल्या जात.

शिळायुद्ध

युद्धप्रसंगी कुठल्याही प्रकारचे अवजार आपल्याजवळ नसेल तर सहज उपलब्ध होणारे अवजार म्हणजे पाषाण अथवा शिळा. या शिळेचा वापर करून युद्ध करण्याची कला गुरुकुल मध्ये पूर्वापार शिकवली जात असे. यात बेचकीचा वापर करून पाषाण मारणे अथवा उंचावरून मोठीच्या मोठी शिला ढकलून देणे, जड शिळा लांबपर्यंत फेकणे, पाषाणाचा अचूक मारा निरंतर करत राहणे अथवा डोंगर कपारीतून अचूक नेम धरून अणकुचीदार पाषाण फेकणे अशा विविध कलांचा याशिवाय युद्धामध्ये वापर केला जातो.

मल्लयुद्ध

शरीर कसदार कसून आखाड्यात आणि तालमीच्या मातीत घट्ट करून समोरच्याच्या मनाचा ठाव घेत त्याला चितपट करणे, यातून शरीरसंपदा कमावणे आणि समोरच्याच्या मनातील भावनभावनांशी खेळत युद्धप्रसंग जिंकणे ही खरी मल्लयुद्धाची कला, भारतीय युद्ध शास्त्रामध्ये पूर्वपार शिकवली जाते. या मल्लयुद्धामध्ये सुद्धा वापरले जाणारे मैदान हे मातीचे असायचे. ही माती दूध, ताक, पाणी इत्यादी टाकून रोजच्या रोज फावड्याचे साह्याने कसून घेतली जायची. अशा मऊसूत मातीमध्ये ही कुस्ती खेळली जात असे. या निमित्ताने नैष्ठीक ब्रह्मचर्याचा पालन करून मल्लयुद्ध खेळणारी पिढी घडवणारा आपला भारत देश. अशा प्रकारची युद्ध कला ती सुद्धा कुठल्याही मानवनिर्मित संसाधनांचा वापर न करता कित्येक वर्ष खेळली गेली.

गदायुद्ध भालायुद्ध वाघनखं युद्ध

पितळपासून पासून बनवलेली भली मोठी वजनदार गदा असो वा लांब सडक काठी मध्ये अत्यंत धारदार पात खोवलेला भाला असो अथवा वज्रमुठीमध्ये सामावलेली वाघनखे असो प्रत्येक शस्त्र वेगवेगळ्या प्रसंगात वापरले जाते. जसे समोरासमोर ताकतीची युद्ध प्रदर्शन असेल तर गदायुद्धाचा वापर होतो , गुप्त वार करण्यासाठी वाघनखं वापरली जातात, तर दूरवर असलेल्या वज्रदेही शत्रूला सुद्धा चितपट करण्यासाठी भालाफेक केली जाते. या सगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा मानवनिर्मित संसाधन वापरली गेली नाही त्यामुळे या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीत पंचमहाभूतांचे प्रदूषण होण्याचा कुठे संभव नव्हता.

धनुर्विद्या

तलवारयुद्ध, कट्यारयुद्ध, लाठीयुद्ध असे धनुर्विद्येचे असंख्य उपांग आहेत. या प्रत्येक युद्धनीतीमध्ये वापरली जाणारी शस्त्रास्त्र पंचमहाभूतांचा ऱ्हास करणारी नाहीत.

शिळायुद्ध

धनुर्विद्या

गदायुद्ध भालायुद्ध वाघनखं युद्ध

मल्लयुद्ध

आपण काय करू शकतो?

  • संस्कृतीने आपल्याला सुसंस्कृतपणा, परोपकार, समाजसेवा, सहकार्य, सहानुभूती दिली आहे, ती जतन करणे.

  • पर्यावरण रक्षणाचे शिक्षण लहानपणापासूनच सुरू केले पाहिजे आणि मुलांच्या मनात निसर्गाबद्दल विश्वास व प्रेम निर्माण झाले पाहिजे.

  • आपल्या छोट्या छोट्या कृतीतून निसर्गाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. जस की स्वच्छतेसाठी भांड्यांसाठी राख,नारळाची कीशी, अंगासाठी पिठे इ.

  • प्रत्येक सण वार समजून उमजून साजरा करावा. त्यामागील निसर्ग भावना लक्षात ठेवावी.

  • जीवनशैली निसर्ग पूरक करावी.