Aarogyam Gallery

Aarogyam Gallery

आपली पंचमहाभूतमहा

आरोग्याची अभिलाषा बाळगणाऱ्या व स्वास्थ्याची साधना करू इच्छीणाऱ्या सर्व बंधु व भगिनींचे ह्या पांचभौतिक महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत. संपूर्ण बाहयसृष्टीज्या महाभूतांपासुन बनलेली आहे ती म्हणजे पृथ्वी, आप, अग्नि, वायु आणि आकाश होय या पाच मुलभूत घटकांना “पंचमहाभूते” असे म्हटले जाते. आता तुम्हाला नक्की प्रश्न पडला असणार की-“अरे! यांना महाभूत असे का म्हणतात? “ याचे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे सृष्टीची किंवा संपूर्ण विश्वाची निर्मिती ह्या पांच महाभूतांच्या संयोगापासुन झालेली आहे. ब्रंम्हांडाची रचना करणाऱ्या ह्या पाचमहाभूतांची शक्ती अत्यंत अद्भूत, अचाट, अमर्याद आणि महाप्रलयंकारी अश्या स्वरुपाची आहे. जगातील अन्य कोणतीही ताकद या महाभूतांवर नियंत्रण मिळवू शकत नाही. मानवी शक्तीच्या मर्यादे बाहेर या मुलभूत तत्वांचे ताकद असल्याकारणाने तसेच या महाभूतांच्या कडूनच त्यांच्या शक्तीचा वापर ह्या मानवी कल्याणाकरीता पूर्वीच्या ऋषिमुनिंकडून व आजच्या आधुनिक काळातील संशोधकांनी केलेले आहे. म्हणूनच यांना “महाभूते” असे म्हणतात.

महाभूतांच्या अमर्याद शक्तीच्या वापराचे उत्तम उदाहरण म्हणजे माणसाने बांधलेली धरणे होय. सृष्टीमध्येच अस्तित्वात असणाऱ्या माती, दगड (पृथ्वी महा) यांचा उपयोग करून दोन डोंगरांच्या मध्ये धरण बांधले जाते. या धारणामध्ये अडवलेले पावसाचे पाणी (जल महा) याला विशिष्ट प्रकारची गती देवुन विद्युतनिर्मिती (तेज महा) केली जाते. एकाच वेळेस ही वीज घरगुती वापरासाठी औद्योगिक कारणांसाठी वापरली जाते. तसेच सूर्यकिरणांद्वारे निर्माण होणारी उष्णता ही सोलर पेनल्स वापरून सौरऊर्जेत रुपांतरीत केली जाते. वायूच्या गतीचा वापर सुद्धा उर्जानिर्मितीसाठी केला जातो. हे सर्व “आकाश” या महाभूताच्या अवकाशात केले जाते. एकंदरीतच सर्व “महाभूते” ही मानवासाठी उपयुक्त आहेत सूर्य, चंद्र, पृथ्वी, वारा, पाणी ही महाभूतांची स्वरूपे आपणाला परिचित आहेत.

पंचमहाभूत

पांचभोतिक मानवी शरीर

आपले मानवी शरीर, सर्व प्राणी सृष्टी ही या निसर्गाचाच एक भाग आहे “मानवी देह” हा पंचमहाभूतांचीच प्रतिकृती आहे भारतीय संस्कृतीमधील विविध वेद, उपनिषदे, धर्मग्रंथानुसार शरीराचे संगठन हे पांचभोतिक आहे. या सर्व ग्रंथांमध्ये सृष्टी निर्मितीची प्रक्रिया वर्णन केलेली आहे. आत्मनो आकाशसंभूत:| असे म्हंटले आहे. आत्मतत्वापासून आकाशाची निर्मिती झाली व पुढे आकाशापासून वायू, वायुपासून तेज, अग्नि महा तेजापासून आप आणि आपापासून पृथ्वी जशी उत्तरौत्तर पुढील महाभूतांची निर्मिती झाली. बाह्य सृष्टीतील वातावरण, मानवासाठी लागणारी हवा, अन्नद्रव्य, पाणी ह्या पर्यावरणातील सर्व गोष्टी पंचमहाभूतांवर अवलंबुन आहेत. या पाचमहाभूतांपेकी कोणत्याही एक महाभूताची कमतरता ही सर्वप्राणी सृष्टी ला घातक आहे म्हणूनच महाभूते समजून घेणे व त्यांचा प्राकृत समतोल बिघडवू न देता नैसर्गिक जीवनशैली अंगिकारणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

शरीरनिर्मिती पांचभौतिक आहे. पंचमहाभूते ही मानवी शरीरात जन्मापासून उपस्थित असतात. गर्भाशयाच्या अवकाशात सुरवातील स्त्रीबीज व पुरुषबीजापासून जेव्हा गर्भाधाराणा होते तेव्हा आकाशाच्या पोकळीत हृदयाची धडधड (वायूचा ध्वनी) निर्माण होते व नंतर हळूहळू उर्वरित महाभूते – तेज, आप, पृथ्वीच्या सहाय्याने इतर अवयव निर्माण होतात व संपूर्ण देहनिर्मिती गर्भाशायात होते.

पंचमहाभूत

मानवी देहातील सर्व कठीण भाग दात, नखे, केस,अस्थि पृथ्वी महाभूता पासून बनतात. शरीराला उभे राहण्याचे सामर्थ्य अस्थिच्या स्थिर गुणधर्मामुळे मिळतो.शरीरातील सर्व प्रकारचे द्रव भाग हे जल महाभूतांपासून निर्माण होतात.. यामध्ये रसधातू, रक्तधातू, लसिका मज्जेतील द्रवभाग, पित्ताची द्रवता, मौसधातुतील द्रवभाग, शुक्रधातू, घाम, मल्मुत्रातील द्रवता यांचा समावेश होतो. एकुणच शरीर ओलसर ठेवल्याचं व तापमान नियंत्रण करण्याचे काम आप महाभूत द्वारे होते. शरीरातील प्रमुख व जठराग्नी.व इतर बारा अग्नी.हे पचनाचे कार्य करतात हे सर्व अग्नी तेज महाभूताचेच प्रतिक होय. अन्नाचे पचन करून यापासून शरीरातील अन्य घटकांची निर्मिती ह्या अग्निकडून होते. वायू म्हणजेच शरीरातील वात दोष होय. हा शरीरातील प्रत्येक क्रियेला गती देण्याचं काम करतो शरीरातील आतड्यांची हालचाल, पित्त व कफदोषांचे वहन करणे, शरीराला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्याची प्रेरणा वायू महाभूतांमुळे मिळते. मन व बुद्धि चे कार्य हे वायू व जल महाभूताच्या बलाशी संबंधित आहे. शरीरातील सर्व ज्ञानेंद्रिय व कर्णेंद्रिय वायूमहाभूतामुळे कार्यरत असतात. शरीरातील सर्वात महत्वाचे महाभूत म्हणजे “आकाश” होय शरीरातील सर्व प्रकारच्या पोकळ्या, अन्नवह सोशाशालीस्त, पोकळी, फुफुसामध्ये असणाऱ्या सर्व पोकळ्या, मस्तिष्क व नसांमधील पोकळ्या रक्तवाहिन्या ह्या आकाश महाभूतानेयुक्त आहेत. श्वसनासाठी हवा आत घेऊन पुन्हा बाहेर टाकली जाते. याठिकाणी वायू व आकाश ही दोन महाभूते एकमेकांशी सहचार्याने राहतात. या प्रकारे शरीरातील सर्व क्रिया ह्या महाभूतांच्या प्रेरणाशक्तीच्या सहचार्यानेच चालू असतात. जोपर्यंत हे संतुलन योग्य असते तो पर्यंत स्वास्थ्य टिकुन राहते.

आपला आहार आणि पंचमहाभूते

निसर्गातील विविध वनस्पतींचा खनिजांचा वापर अन्नद्रव्य म्हणुन आपल्या आहार मध्ये केला जातो त्याप्रमाणे शरीर पांचभोतिक संगठनयुक्त आहे, याच प्रमाणे त्याचे पोषणही निसर्गातील पांचभोतिक द्रव्यांद्वारे केले जाते ही सर्व आहारीय पांचभोतिक द्रव्ये तुमच्या स्वयंपाक घरांत उपलब्ध आहेत. ही सर्व द्रव्ये अन्न कळतनकळतपणे गृहिणी माता भगिनिकडून स्वयंपाकासाठी वापरली जात आहेत. आपले स्वयंपाक घर हे महाभूतांनी युक्त, समृद्ध द्रव्यांनी ठासून भरलेले असते तुम्हा सर्वांना आशचर्य वाटेल परंतु अहोआपण महाभूतांचेच सेवन करून आपले पोट भरतो, तहान भागवतो फक्तअल्प प्रमाणात व सूक्ष्म स्वरुपात! हे कसे काय? होय तेच आता जाणून घेवूया!चला,

आपल्या आहारात एकदल धान्य, द्विदल धान्य, हिरव्या पाल्याभाज्या, फळभाज्या, मांसाहार, दुग्ध आहार फळाहार, मसाल्याचे पदार्थ, तेल, तूप, इ. सर्वांचा समावेश असतो. आहार हा सहारसांनी बनलेला ँषडरस युक्त असतो हे आपल्याला माहित आहेत.. गोड आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट असे हे सहा रसदेखील महाभूतांपासूनच बनतात. आहारीय द्रव्यांपेकी उडीद, गहू हे पार्थवी गुणांनी युक्त असल्याने ते शरीरातील मास, मेद, अस्थि यांची वाढ घडवतात. मेदोधातुला बळकटी देऊन शरीराचे ही बल वाढवतात. तांदुळाचा वापर हा शरीरातील आप महाभूताच्या बुद्धीसाठी होतो. तांदूळापासून पेज, खीर, भात इ. पदार्थ बनवले जातात. तांदूळ, दुधआहार यांच्या द्वारे शरीरातील रसधातूची वाढ होते. विविध प्रकारचे मासाल्याचे पदार्थ हे तेज महाभूत प्रधान असतात. सुंठ, जिरे, मोहरी, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सर्व शरीरातील अग्नींना जागृत, तवेत ठेवतात. प्राकृत अन्न पचनासाठी त्यांचा खूप फायदा होतो. यांच्या जोडीलाच पाचक म्हणून बडीशेप, ओवा, धनादाल, पानाचा विडा यांचे सेवन देनंदिन आयुष्यात आपण करतो ही द्रव्ये पचनास मदत करतात.

आरोग्यदायी दिनचर्या

आयुषो वेद: आयुर्वेद:| आयुर्वेद हा आयुष्याशी निगडीत वेद आहे. या आयुर्वेदाचे प्रथम प्रयोजन हे “स्वस्थ व्यक्तीच्या स्वस्थाचे रक्षण करणे” असे आहे. दोष, धातु व मळ यांची प्राकृलावस्था व इंद्रिय, मन, आत्मा यांची प्रसन्नावस्था याच्यावरती स्वास्थ्य, आरोग्य अवलंबून आहे. स्वस्थवृत्त हे प्रामुख्याने वैयक्तिक (पर्सनल) आणि सामूहिक (सोशल) असे दोन प्रकारचे आहे. यापैकी वेैयक्तिक स्वस्थवृत्तामध्येच दिनचर्या व रात्रीचर्या हे दोन प्रमुख भाग समाविष्ट होतात. स्वास्थ्य रक्षणासाठी व रोगप्रतिकार करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या दिनचर्याचे पालन करणे शरीराला उपयुक्त ठरेल .हल्ली चे जग हे “जेतयुग” म्हणुन संबोधले जाते ते आणखीनच गतीमान बनत चालले आहे. शरीराकडे लक्ष न देता घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या गतीमान जीवनाशैली मुळे शरीराची हेळसांड होते आहार, निद्रा, इ. गोष्टी या अयोग्य वेळी घडून विविध आजारांची पायाभरणी होते.

म्हणूनच या आजारांची निर्मिती होवू नये आणि स्वास्थ्य टिकुन राहावे यासाठी निसर्गाशी जवळीक साधणारी पांचभोतिक नियमांचे पालन करून पाळावयाची दिनचर्या आपण पाहू.

दिनचर्या

स्वस्थ व्यक्तिने सकाळी उठल्यापासुन सूर्यास्तापर्यंत व त्यानंतर रात्री झोपे पर्यंत काय करावे, आहार व विहाराचे कोणते नियम पाळवेत यासाठीचे दैनंदिन वेळपत्रक म्हणजे दिनचर्या होय.

आयुर्वेदाने दिनचर्येतील सर्व कामे ही वात, पित्त व कफ या तीन दोषांचा विचार करून सांगितलेली आहेत कारण या तीन दोषांची साम्यवस्था म्हणजे आरोग्य व आरोग्य व बिघाड म्हणजे आजार होय. दिनचर्येतील संपूर्ण दिवस व रात्रीतील या दोषांचे प्राधान्य लक्षात घेवुनच प्रत्येक कर्म हे निश्चित करण्यात आले आहे.उदहरण रात्रीच्या शेवटच्या प्रहरात (पहाटे २ ते ६ पर्यंत) वात दोषाचा जोर असल्याने पहाटे ब्राम्ह्मुर्तावर उठून मलमूत्र विसर्जन करण्यास सांगितले आहे. दिवसा व रात्री ६ ते १० वाजेपर्यंत कफदोषाचे प्राबल्य असते तर सकाळी १० ते २ या काळात पित्ताचे प्राबल्य असते या सर्वांचे मूळ जे आहे ते पंचमहाभूतांशी निगडीत आहे कारण निसर्गातील, सूर्य, चंद्र, वारा यांचा संबंध शरीरातील पित्त, कफ व वात यांच्याशी सुद्धा आहे. बाह्यसृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे त्याप्रमाणे शरीरही पांचभौतिक आहे. म्हणूनच पंचमहाभूतांचे प्रतिक असलेल्या दोषांचा विचार करून सांगितलेल्या या आयुर्वेदाचे नियमांचे पालन करणे दिनचर्यासाठी महत्वपूर्ण ठरते. परंतु हल्लीच्या दैनंदिन आयुष्यात हे तंतोतंत करणे शक्य नसले तरी जास्तीत जास्त नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास शरीर व मनाचे आरोग्य टिकणे सहज शक्य होईल.

दिनचर्येमध्ये सर्वसाधारणपणे पहाटे उठणे, शौचविधी, दंतधावन, वंदन, जिव्हानिर्लेखन, अंजन, नस्य, धुमपान, अभ्यंग, उदवर्तन, व्यायाम, स्नान, आहार,व्यवसाय व रात्रीचर्या असा क्रम आढळतो

१. पहाटे उठणे

ब्राह्मे मोहते उद्दिष्टेत जिल्हा निरूपयन सर्वांनी ब्राम्ह् मुहुर्तावर उठावे असे सांगितले आहे. ब्राम्ह् मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा भाग, सुर्योदया पूर्वी दीड तास सध्याच्या कालप्रमाणे पहाटे साडेचार ते साडेपाच हा काल यासाठी योग्य ठरेल. ब्राम्ह् मुहूर्त हा वाताचा प्राकृत काल आहे. रात्रभर शरीरात व मनाला विश्रांती मिळल्या मुळे पहाटे लवकर उठल्यास शरीर व मन प्रसन्न व ताजेतवाने राहते. ब्राम्ह् मुहुर्ताचा काळात सत्वगुणांचाउत्कर्ष झालेला असतो म्हणुनच हा काल ईश चिंतनासाठी व साधनेसाठी योग्य सांगितलेला आहे. पहाटे उठल्यानंतर मनुष्याने आदल्या दिवशी सेवन केलेले अन्न पचले आहे किंवा नही याचा विचार करून पुढील दिनक्रम ठरवावा.

सकाळी लवकर उठण्या साठी रात्री लवकर झोपणे अपेक्षित आहे. रात्री कोणत्याही कारणाने जागरण करू नये विद्यार्थ्यांनी रात्रीच्या ऐवजी पहाटे अभ्यास केला तर तो त्यांच्या स्मरणात राहील त्यांची ग्रहण शक्ती वाढेल टी व्हि, मोबाईल, सिनेमा इ. गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात यांचा वापर चालूच ठेवला तर अंतर्मन जागे राहते व त्यामुळे अनिद्रा, अजीर्ण, मलबद्धता, आम्लपित्त, डोकेदुखी असे विकार निर्माण होतात म्हणुन जागरण टाळावे.

पहाटे उठल्यामुळे अपान वायुमुळे आन्नाचे चलनवलन (मलसंवेदना) निर्माण होते. आदल्यादिवशी घेतलेल्या अन्नाचे योग्य पचन झाले असल्यास मलविसर्जनाची संवेदना निर्माण होते हा वेग निर्माण झाल्यानंतर शांतचित्ताने मलमूत्र विसर्जन करून गुदभागाची स्वच्छता करावी त्यानंतर हात, पाय गरम पाण्यासह साबणाने धुवावेत.

पहाटे न उठता उशीरा उठल्यामुळे प्राकृत मलसंवेदना निर्माण होत नाही ती अडवली जाते तर मलसंवेदना अडवली गेली तर पोट फुगणे, हातपाय दुखणे, मलबद्धता ढेकर येणे अशी लक्षणे निर्माण होतात. तसेच मलाची संवेदना निर्माण झाली नसेल तर मुदाम बळपूर्वक, कुंथुन मलप्रूवृत्ती घडवू नये.

दातांच्या आरोग्यवरच शरीराचे स्वास्थ्य अवलंबुन आहे. अन्नाचे चर्वण करणे हे दातांचे प्रमुख कार्य आहे म्हणुन दात बळकट व निरोगी ठेवण्यासठी रोज सकाळी उठल्यानंतर दंतधावन करावे. यासाठी आयुर्वेदिय ग्रंथकारांनी कडू, तिखट व तुरट रसांच्या वनस्पती मुख्यत: वापराव्यात असे म्हंटले आहे ..उदा. कडूनिंब, खदिर, करंज, बाभळ, वड, जाई, अर्जुन, वज्रदंती इ. वनस्पतींच्या करंगळी एवढ्या जाड व अंदाजे १२ ते १५ सेमी लांब काड्या घ्याव्यात. तिचे एक टोक चावून ब्रुशसारखे करून हिरड्यांना त्रास होणार नाही या तऱ्हेने दात घासावेत.

दंतधावनानंतर गरम पाण्याने चूळ भराव्यात जीभ घासावी. दंतधावन हे सकाळी उठल्यावर, निद्रेपूर्वी, भोजनानंतर करावे जेणेकरून मुखाची, अरुची दुर्गंधी नाहीशी होते. कफाचा चिकटा तोंडातून निघुन जातो, दातांचे आरोग्य सुधारते. दंतधावनासाठी काड्या न मिळल्यास त्याच वनस्पतींच्या चूर्णाचा वापर करावा दंतधावनानंतर त्रिफळ किंवा त्रिफळा त्रिकूट अर्जुन यांचा वापर दंतधारनासाठी करावा.

दात घासण्यासाठी अतिशय मऊअसॆ चूर्ण, पेस्ट तसेच गोड, आंबट व खारट रसांचे पदार्थ वापरू नयेत उदा. मीठ, गोड पेस्ट इ.

दंतधावनानंतर आपले कुलदेवत, गुरु, आई-वडील इतर वडीलधारी माणसे यांना वंदन करावे. त्यानंतर सूर्योदयानंतर आपला वेळ नामस्मरण मध्ये घालवावा त्यामुळे आयुष्य हे लौकिक व भौतिक पातळीवरून उच्च आध्यात्मिक पातळीवर राहण्यास मदत होते.

यानंतर ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी काही कर्मे सांगितली आहेत.

अंजन हे डोळ्यांच्या हितासाठी, आरोग्यासाठी सांगितले आहे डोळा हा तेजाचा अवयव असल्याने शीत गुणात्मक सोविरंजन किवा काळे काजळ सुरमा यांचा वापर करावा. सोवीर हे एक खनीज असून माक्यांच्या रसात घोटून त्याचा उपयोग करतात.

अंजनासाठी घरगुती स्वरुपात तयार केलेले काजळ आपण वापरू शकतो. निरांजनात साजूक तुपाची वात लाऊन त्याच्या ज्योतीपासून निघालेली काजळी चांदीच्या व तांब्याच्या ताम्हनावर घरून काजळी बनवता येते आयुर्वेदाने अंजनासाठी अंदाजे १२ सेमी (दहा अंगुळे) लांब मधोमध फुगीर असा सुवर्ण चांदी किंवा तांब्याच्या सळीचा वापर सांगितला आहे ही सळई अंजनाच्या मिश्रणात बुडवून डोळ्यातुन पापलगत ३ वेळा फिरवावी. त्यामुळे डोळे स्वच्छ होतात त्यांचा दाह व चिकटपणा नाहीसा होतो डोळ्यावरील ताण कमी होतो.

डोळ्यांचा व्यायाम

१) तळहातावर, बशीमध्ये पाणी घेऊन डोळ्यांची उघडझाप करावी.
२) कोवळ्या उन्हात सूर्याकडे ५ ते १० मिनीटे पाहावे व त्यानंतर सूर्याकडे पाठ करून उघडझाप करावी.
३) रात्री चंद्राकडे १५ मिनीटे टक लावून पाहावे.
४) डोळ्यांच्या खाली, वर, उजवीकडे, डावीकडे अशा हालचाली कराव्यात.
५) डोळ्यांवर हात ठेवुन काही काळ बंद करून बसावे याने शक्ती येते.

डोळ्यांची विशेष काळजी

१) घरामध्ये स्वच्छ प्रकाशरचना, उजेड असावा.
२) नेहमी पादत्राणे वापरावीत, वाहनावर चष्मा वापरावा.
३) आहार षड्सात्मक असावा.
४) टी व्हि, मोबाईल, कॉम्पुटर, चित्रपट यांचे सतत सेवन करू नये.
५) सूक्ष्म, चंचल, बिभत्स व अतिप्रखर गोष्टी पाहणे टाळावे.

नस्यद्रव्य

नस्यांसाठी नेहमी तीळतेल वापरावे- अणूतेल किवा तूप सुद्धा चालते.

नस्यविधी

खांद्याखाली उशी ठेऊन, मान डोके कलते करून नासा मार्ग सरळ रेषेत राहील याची खात्री करून प्रत्येक नाकपुडीत 2-2 थेंब तेल चे सोडावेत. घशामध्ये हे तेल आल्यानंतर गरम पाण्याने चुळा भराव्यात स्वस्थ व्यक्तिने नस्यासाठी एकूण आठ थेंब इतक्या मात्रेचा वापर करावा.

नस्यामुळे स्थानिक व सार्वदेहिक असे दोन प्रकारचे होतात. दररोज नस्य केल्यास शरीरातील सर्व इंद्रिय कार्यक्षम होतात. स्मरणशक्ती वाढते आवाज सुमधुर व स्थिर, स्निध्य होतो. चेहऱ्यावर प्रसन्नता येते खांदे, मान, छाती, पृष्ठभाग हा घाष्टपुष्ट व भरदार होतो त्वचेत सुरकुत्या पडणे, केस गळणे, पिकणे, चेहऱ्यावर वांग, डाग पडणे इ. विकार निर्माण होत नाहीत. गळ्यापासून वरच्या भागात असणारे ज्ञानेंद्रिय, कान, नाक, डोळे, मेंदू, जिव्हा यांचे कार्य प्राकृत राहते

कान हे वाताचे स्थान आहे. यासाठी कानामध्ये औषेधी तेलाचे थेंब टाकणे म्हणजे कर्णपूरण होय. कानातील मळ काढून टाकुन त्यांची स्वच्छता राखावी. दर आठ दिवसांनी दोन्ही कानांमध्ये १ वेळा तेलाचे थेंब कोमट करून घालावेत. एका बाजूचा कान पूर्ण भरून तेल घालणे. ५ मिनीटे थांबून ते तेल काढुन घ्यावे पुन्हा कान स्वच्छ करावा मग दुसऱ्या कानात अशीच क्रिया करावी. यामुळे कानांची श्रवणशक्ती वाढते व नस्या सारखेच अन्य फायदे मिळतात.

औषधी द्वव्यांचा काढा + तेल एकत्रितपणे तोंडामध्ये धरून ठेवणे याला गंडूष म्हणतात. मुख व वागिन्द्रीयासाठी हे कर्म सांगितले आहे. स्नेह्युक्त गंडूषाचा द्रवभाग (कडा + तेल) तोंडात मावेल इतका घ्यावा. काही काळ थांबुन नंतर तो थुंकून टाकुन चूळ भराव्यात. गंडूषधारण केल्यामुळे मुखाचे संरक्षण होते. दंतरोग, ओठ फुटणे, खरखरीत होणे, आवाज फुटणे हे विकार होत नाहीत.

गंडूषाप्रमाणेच “कवलग्रहण” नावाचा प्रकार आहे. कावलामध्ये स्नेहद्रव्य नसते फक्त काठा तोंडात धरून खुळखुळवून चूळ भरल्या जातात यामुळे अरुची, मळमळ, मुखदुर्गंधी नाहीशी होते. कवलासाठी वड, उंबर, अर्जुन, खदीर, त्रिफळ यांच्या सालीचा वापर करतात.

धुमपान म्हणजे औषधी द्रव्यांचा धुर सेवन करणे होय धुम्रपान व धुमपान यातील हा महत्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. नस्यानंतर धुमपान करावे हे धुमपान धुमयंत्राच्या सहाय्याने करावे. धुमपानासाठी धुमवर्ती (औषधी द्वव्यांची लांबट नळी) ची आवश्यकता असते निर्गुंडी बीज, वाळा, चंदन बाळा चंदन नागकेसर, राळ, मुस्ता, धूप इ. पासुन ८ अंगुळ लंबीची धुमवर्ती बनवून ती तेलमध्ये बुडवुन धुमयंत्रात ठेवावी. धुमपान करताना नाकाने किंवा तोंडाने धूर ओढावा परंतु बाहेर सोडताना मात्र तोंडानेच सोडावा.

विधिवत (धुमपानामुळे वाणी, मन, इंद्रिय प्रसन्न राहतात. वाताचे शमन होते. हृदय कंठ याची शुद्धी होते केस, दाढी बळकट होते घसा व त्यावरील भागात वात, कफाचे आजार होत नाहीत विशेषत: डोके दुखणे, कान दुखणे, केश गळणे, पिकणे, आवाज बसणे, सर्दी, खोकला इ. विकारापासून संरक्षण मिळते. दिनचर्येत विशेषत: स्वास्थ्य रक्षणासाठीचे प्रायोगिक असे नित्य सेवनीय धुमपान वापरावे.

धुमपानाचे अतीवापराचे दुष्परिणाम असतात अति धुमपानामुळे टाळू, शीर, कंठ याठिकाणी शुष्कता येते, तृष्णा, भ्रम, मूर्च्छा येते.

संपूर्ण शरीरात दररोज तेलाचे मर्दन करणे म्हणजे अभ्यंग होय. दीपावली सणाच्या निमित्ताने सर्वत्र अभ्यंग केले जाते त्यानंतर मात्र याचा दिनचर्येत वापर केल जात नाही. वेळ व महत्व याची उणी व अ सल्याने असे होते परंतु आयुर्वेद शास्त्राने मात्र दिवाळीच्या स्नानापुरते अभ्यंग न करता त्याचा वापर दररोज करण्यास प्रोस्सहित केले आहे.

अभ्यंग विधीसाठी शीतकालात कोमट तीळ तेल वापरावे व उष्णकाळात खोबऱ्याचे तेल वापरावे सर्वांग अभ्यंगामध्ये विशेष करून डोके व तळपायांना तेल लावावे कानामध्ये तेलाचे थेंब घालावेत त्यामुळे हनुवटी, मान, स्कंध पुष्ट होतात. पायाला तेल लावल्याने झोप प्राकृत रित्या येते डोळ्यांना गारवा वाटतो.

नेहमी शरीरात तेला चा अभ्यंग केल्याने शरीराला पुष्टी मिळून त्याची श्रम करण्याची ताकत वाढते. त्वचेवर तेलाचे स्नेहन केल्याने तेल हे त्वचेद्वारे शोषले जाते त्यामुळे त्वचा मृदू, कोमल, कांतिमान बनते. केसांचे पोषण होवुन केस काळे व लांबसडक होतात, दीर्घायुष्यलाभते म्हणूनच रोज अभ्यंग करणे हा निस्तेज त्वचा, अकाली गळणारे व पिकणारे केस यासाठीचा खात्रीचा उपाय आहे.

अभ्यंग कोणी करू नये?याबद्दल सांगताना ग्रंथकार म्हणतात की ताप आलेली व्यक्ती, अतिसार, अजीर्ण व कफरोगाने पिडीत व्यक्तींनी अभ्यंग टाळावे.

अभ्यंगानंतर व्यायाम करावा. शरीरायासजनक कर्म व्यायामसंज्ञीतम| शरीराच्या विशिष्ट प्रकारच्या हालचालींना व्यायाम असे म्हणतात. शरीराच्या योग्य प्रकारच्या हालचालींमुळे शरीरात बळकटी येते उदा. जोर, बैठका, सूर्यनमस्कार, चालणे, धावणे इ.

व्यायामामुळे शरीर हलके बनते. अग्नि प्रदिप्त होते. मेदाचा क्षय होवुन अवयव पिळदार व घाटदार बनतात. शरीरात बळकटी आल्याने काम करण्याची तयारी वाढते. सर्वसाधारणपणे तोंडाने श्वास घ्यायला लागुन घशाला कोरड पडेपर्यंत व्यायाम करावा. तसेच कपाळ, काख, मान याभागात घाम येण्यास सुरवात होईपर्यंत व्यायाम करावा. अधिक काळ नको.

हेमंत, शिशिर व वसंत ऋतुमध्ये अर्धसक्ती व्यायाम करावा तर इतर ऋतुमध्ये तो कमी प्रमाणात करावा. वृद्ध, वातप्रकृती,पित्तप्रकृती व अजीर्णाने पिडीत व्यक्तींनी व्यायाम करू नये. गरजेपेक्षा अधिक व्यायाम केळ्यामुळे शरीराची बळहानी होण्याची शक्यता असते.

उदवर्तन म्हणजे संपूर्ण शरीरात औषधी वनस्पतींची कोरडी चूर्णे चोळणे. थोडक्यात त्वचेवर उटणे लावणे. व्यायामामुळे शरीरात आलेल्या घामाची दुर्गंधी व चिकटपणा घालवण्यासाठी उदवर्तन करावे. शरीरात सुगंधी व व प्रसाधन करणाऱ्या औषधी द्रव्यांचे उटणे करणाऱ्या औषधी द्वव्यांचे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. विषारी तत्वे नाहीशी होतात. मेदाची वाढ होत नाही त्वचा मृदुमुलयाम, सतेज व कोमल, कांतिमान होते. उदवर्तनामुळे मानसिक आरोग्य प्राकृत राहते. मनावरील ताण कमी होतो. हलके वाटते.

नेहमी आवळकाठीच्या चुर्णाने उदवर्तन केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. केस पांढरे होत नाहीत, व्यक्ती दीर्घायुषी होते असा संदर्भ योगरत्नाकर ह्या ग्रंथात आढळतो.

उदवर्तनानंतर स्नान करावे ऋतुनुसार आंघोळीसाठी गरम किवा गार पाणी वापरावे. थंड पाण्यामुळे पित्ताचे शमन होते तर गरम पाण्यामुळे वाताचे, कफाचे शमन होते गरम पाण्याने फक्त खांद्याखाली स्नान करावे गरम पाणी डोक्यावरून घेवू नये त्यामुळे केस व डोके यांची शक्ती कमी होते. बारा महिने थंड पाण्याने स्नान करू नये.

स्नानामुळे शरीरावरचा मळ जावून ते स्वच्छ होते अग्नि प्रदिप्न होतो. स्नानामुळे आयुष्य, बळ, उर्जा यांची वाढ होते. त्वचा सतेज होवुन त्वचेची खाज नाहीशी होते. मन प्रसन्न व ताजेतवाने होते.

स्नान कुणी करू नये?

ताप आलेलं रुग्ण, अतिसार आध्यान, भ्रम, नेत्र, मुख, कर्ण विकार इ. विकारांनी आजारी असलेले लोक तसेच भोजनोउत्तर स्नान वर्ज्य समजावे

स्नानानंतर स्वच्छ धुतलेले, न फाटलेले, सभ्यतेची मर्यादा राखतील असे कपडे घालावेत. थंडीमध्ये लोकरीचे उबदार कपडे, तर उन्हाळ्यात भगवी, खेस रंगाची किंचित सैलसर हलकी वस्त्रे घालावीत. तर पावसाळ्यात फार सैल नाही, फार उबदार नाही अशी शुभ्र वस्त्रे घालावीत. वस्त्र धा रणानंतर चंदन, केसर, कस्तुरी इ. चे अत्तर लावावे. सुगंधी पुष्पे, माळवीत , धारण करावीत. यामुळे मनाची शरीराची प्रसन्नाता वाढते.

स्नानानंतर स्वच्छ धुतलेले, न फाटलेले, सभ्यतेची मर्यादा राखतील असे कपडे घालावेत. थंडीमध्ये लोकरीचे उबदार कपडे, तर उन्हाळ्यात भगवी, खेस रंगाची किंचित सैलसर हलकी वस्त्रे घालावीत. तर पावसाळ्यात फार सैल नाही, फार उबदार नाही अशी शुभ्र वस्त्रे घालावीत. वस्त्र धा रणानंतर चंदन, केसर, कस्तुरी इ. चे अत्तर लावावे. सुगंधी पुष्पे, माळवीत , धारण करावीत. यामुळे मनाची शरीराची प्रसन्नाता वाढते.

मळ बाहेर टाकणाऱ्या कान, नाक, डोळे, गुदमार्ग, योनीमार्ग यांची स्वच्छता राखावी नखे,केस, दाढी योग्य वेळी कापावीत असा सल्ला ग्रंथकार देतात शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसह बाह्य स्वच्छता व निगा नेहमी राखणे, टिकवून ठेवणे महत्वाचे असते

आयुर्वेदाने आहाराला शरीराचा उपस्तंभ म्हणजे आधार मानले आहे. म्हणूनच आहार हे एक “यज्ञकर्म” आहे निव्वळ पोटभरून जेवणे असा अर्थ घेवू नये. स्वस्थ व्यक्तिने दिवसातून दोनवेळ सकाळी १० ते १२ यादरम्यान व रात्री ८ ते ९ या वेळेत भोजन करावे. सहा रसांनीयुक्त असा आहार योग्य प्रमाणात सेवन करावा. कडकडून भूक लागल्यानंतरच (प्रदिप्त अग्नि असताना) जेवण करावे म्हणजे अन्नपचन होते एकदा खाल्ल्यानंतर ४ तास काहीही खावू नये. ऋतुमानानुसार थंडीच्या दिवसात न्याहरी करावी मगच बाहेर पडावे सकाळी पूर्ण उपाशीपोटी बाहेर पडू नये त्यामुळे अम्लापित्तासारखे व्याधी होत नाहीत जेवण हे एका ठिकाणी (स्वयंपाकघरात) बसून एकाग्र मनाने व शांत चित्ताने आहारावर केंद्रित करून सावकाश सेवन करावे घाईगडबड, उभ्याने, बोलत, गप्पामारत, क्रोधाने, चिडचिड करत कधीही भोजन करू नये.

भोजनानंतर अन्न पचण्यास मदत व्हावी, मुखशुद्धी व्हावी यासाठी तांबुल म्हणजे विडा खावा कापुर, जायफळ, कंकोळ, वेलची, कात, लवंग, सुपारी व चुना ही द्वव्ये योग्य प्रमाणात नागवेलच्या पानात घालून त्याचा विडा तयार करून खावा. आयुर्वेदातील “योगरत्नाकर” या ग्रंथात “त्रयोदशगुणी” विड्याचे वर्णन आढळते. कृमिनाशक, कफनाशक, दुर्गंधी कमी करणारा, मुखशु द्धीकारक, पाचक असे तांबुला चे ऐकूण १३ गुणवर्णन केले आहेत.

आयुर्वेदाने पानाचा देठ व शेंडा व्याधीकारक नसल्याने व पानाच्याशिरा बुद्धीनाशक असल्यामुळे काढून टाकण्यास सांगितले आहे. तंबाखू घालून पान खावू नये या सर्व गोष्टी लक्षात ठेवुन पान / तांबुल सेवन केल्यास तोंडात रुची येऊन तोंड सुगंधी होते.

आहार सेवनानंतर प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा. शेती, व्यापार, नोकरी इ. जो योग्यमार्गाने धनप्राप्ती करून देणारा व्यवसाय असेल तर तो करावा. धन प्राप्तीसाठी अयोग्य, गैर मार्गाचा अवलंब करू नये.

रात्रीचर्या

सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्यापर्यंतच्या काळात करावयाच्या कर्माला रात्रीचर्या म्हणतात. याकाळात मुख्यत रात्रीचे भोजन, निद्रा आणि ब्रम्हचर्य या कर्माचा समावेश होतो.

१. रात्रीचे भोजन

रात्रीचे जेवण हे रात्रीचा दुसरा प्रहर सुरु होण्यापूर्वी म्हणजे रात्री ८ ते ९ च्या दरम्यान करावे हे भोजन किंवा आहारातील पदार्थ दिवसाच्या भोजनापेक्षा प्रमाणाने कमी पण पचायला हलके असे घ्यावे. रात्रीच्या आहारामध्ये भाकरी, भाजलेल्या तांदळाचा भात, भाज्यांचे सूप, उकडलेल्या भाज्या यांचा समावेश करावा. फार पचायला जड अन्न रात्री सेवन करू नये. रात्री दही खावू नये. तसेच तळलेले, तेलकट, मसालेदार पदार्थ सेवन करू नयेत. उन्हाळा सोडून इत्तर ऋतु मध्ये शीतपेये, आईस्क्रिम व अन्य थंड पदार्थ खावू नयेत.

रात्रीच्या भोजनानंतर शतपावली करून १ तासाने निद्रा घ्यावी सर्वसाधारणपणे रात्री १० वाजता खेळत्या हवेमध्ये जोराचा वारा लागणार नाही अश्या खोलीत मऊ सुखासन वर झोपावे.

दिवसभर झालेल्या शारीरिक, मानसीक श्रमाने झोप येते. सतत मन, आत्मा व इंद्रिय विषयांचा संयोग होत असतो या प्रक्रियेत मन थकते. त्याचा इंद्रियांशी होणारा संयोग थांबतो त्यामुळे विषयाचे ज्ञान होत नाही व झोप यायला लागते. या सर्व प्रक्रियेमध्ये तमोगुणाची वाढ झाल्याने निद्रा येते तर या उलट सकाळी ब्राह्ममुहूर्तावर सत्वगुणाची वाढ झाल्यामुळे जाग येते.

रात्री स्वाभाविकपणे, निसर्गत: येणाऱ्या निद्रेला आरोग्यकारी निद्रा म्हंटले आहे. अशा प्रकारच्या निद्रेवर माणसाचे सुख – दुख, बळ – अबळ, जीवन – मृत्यू इ. गोष्टी अवलंबुन असतात म्हणुनच या प्राकृत, आरोग्यकारी निद्रेचे महत्व आयुष्यामध्ये आहे.

योग्यवेळी रात्री न झोपता जागरण केल्यास वाताची वाढ होवुन शरीरात रुक्षत्व वाढते तर दिवसा झोप घेतल्यास कफाची वाढ होवुन मेदोरोग वाढतात म्हणुन या दोन्ही ही गोष्टी टाळव्यात. दिवसाच्या वेळेत, झोपू नये या नियमाला काही अपवाद आहेत. रात्रपाळी करणारे कामगार, अभ्यास विध्यार्थी, नाट्यकलाकार, प्रवासामुळे थकलेले प्रवासी, विविध आजारांनी पिडीत लोक, या सर्वांनी दिवसा निद्रा घ्यायला हरकत नसते. तसेच ग्रीष्म ऋतुत / उन्हाळ्यात दिवसा निद्रा सर्वांनीच घ्यावी फक्त रात्रीच्या वेळे पेक्षा कमी वेळ, शक्यतो भोजनापूर्वी घ्यावी. यासर्व कारणांसाठी दिवसा झोप घेतल्याने वातशमन होवुन धातुसाम्य राहते, कफपोषण होवून बळ वाढल्याने शरीर, गात्रे आणि आयुष्यात स्थिरता येते.

हा झाला दिवसा निद्रा कोणी घ्यावी? या विषयीचा उहापोह. परंतु इतर सर्व जणांना दिवसा झोपण्यास मनाई आहे. उन्हाळा सोडून इतर सर्व ऋतुंमध्ये दिवसा झोपू नये. लहान मुले व वृद्ध व्यक्ती सोडून इतरांनी दिवसा झोपू नये तसेच कफ, मेदवृद्धि असताना दिवसाची झोप वर्ज आहे.

प्राकृत निद्रा येण्यासाठी दिनचर्येतील अभ्यंग, उदवर्तन आणि स्नान ह्या कर्मांचा फायदा होतो. आहारामध्ये मांसरस, म्हेशीचे दुध, स्नेहपान, मिठाई सेवन, मनाला अनुकुल सुखकारक गोष्टी मस्तक व चेहऱ्याला लेप लावणे, पादसंवाहन, सुखशय्या, या सर्व गोष्टी निद्रेला अनुकुल किवा उपकारक आहेत.

ही झाली एकुण दिनचर्या व रात्रीचर्या याबद्दलची माहिती या सर्व बाबींचा स्वतःच्या आरोग्यासाठी अवलंब करावा व स्वास्थ्य प्राप्त करून ही धन्वंतरी चरणी प्राथना|

शुभ भवतु|

आरोग्यदायी ऋतुचर्या

ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार पाळवयाचे आहार व विहाराचे विशिष्ट नियम होय. आयुर्वेदातील विविध ग्रंथांमध्ये सहा ऋतूंची लक्षणे व काळातील परिचर्याचे स्पष्टपणे वर्णन केलेले आहे. स्वस्थ वृत्तामध्ये शरीर व मनाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाने काही विशिष्ट नियम दिनचर्या व ऋतुचर्येच्या स्वरूपात सांगितलेले आहेत. हल्ली समाजात सर्वत्र जंतू शिवाय होणाऱ्या व चुकीची निवेदनशैली आचरणात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या व्याधींची संख्या वाढलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ह्या आरोग्य रक्षणासाठीच्या नियमांचे महत्त्व लक्षात येते.

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात म्हणजे एक वर्ष. पृथ्वीचा असा हा स्थिर परंतु थोड्याशा कललेल्या अवस्थेत असल्याने ऋतू निर्माण होतात. हा एक वर्षाचा कालखंड दोन प्रमुख काळामध्ये विभागला आहे, उत्तरायण आणि दक्षिणायन यापैकी उत्तरायणामध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म हे तीन ऋतू तर दक्षिणायनात वर्षा, शरद, हेमंत हे तीन ऋतू येतात असे एकूण सहा ऋतू आयुर्वेदाने मानले आहेत. ऋतूनुसार बदलत्या हवामानामुळे सृष्टीतील सजीव व निर्जीव दोघांवर अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही प्रकारचे परिणाम होत असतात. प्रतिकूल परिणामा पासून स्वतःचे रक्षण करणे व अनुकूल परिणामांना सुयोग्य असा आहार विहाराची जोड देऊन आरोग्य सुधारणे हा ऋतुचर्या पालनाचा महत्त्वाचा फायदा व प्रमुख उद्दिष्ट आहे.

१. उत्तरायण / आदानकाल

या काळात सूर्य हा उत्तर गोलार्धात असतो. भारत देश उत्तर गोलार्धात आहे त्यामुळेच शिशिर ऋतूपासून ग्रीष्मापर्यंत हळूहळू सूर्याचा प्रभाव वाढत जातो या काळात उष्ण वारे वाहू लागतात. सृष्टीमध्ये वातदोष समान कडू, तिखट, कषाय रसांची निर्मिती होते. तसेच सृष्टी व मानवी शरीरातील स्निग्धतेचे स्नेहाचे शोषण होवून कोरडेपणा वाढायला लागतो. या दोन्हीमुळे सृष्टी व प्राणीमात्रांचे बळ कमी व्हायला लागते सृष्टी द्वारे ते हिरावून घेतले जाते म्हणून याला “आदानकाळ” म्हणतात.

दक्षिणायनात सूर्य हा कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे सरकायला लागतो. पृथ्वीवर उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रभाव कमी होऊन जल व चंद्राचे प्राबल्य वाढते. या काळात पावसाची सुरुवात झालेली असते त्यामुळे अम्ल, लवण, व मधुर या तीन कफसमान रसांची उत्पत्ती होते. सृष्टी व मानवी शरीरात स्नेह व बळाची वाढ होवू लागते. सृष्टीकडून बलाचे दान केले जाते म्हणून या काळाला “निसर्गकाल” म्हणतात.

प्रामुख्याने शिशिर, वसंत, ग्रीष्म या तीन ऋतूंमध्ये बळ कमी कमी होत जाते तर वर्षा , शरद, हेमंत या तीन ऋतूंमध्ये क्रमाने बळ वाढत जाते यानंतर आपण प्रत्येक ऋतुची परिचर्या सविस्तरपणे पाहूया

वर्षा ऋतुचर्या

वर्षाच्या ऋतुच्या सुरुवातीस नैऋत्य पश्चिमेकडून जोरदार वारे वाहू लागते. आभाळ ढगांनी भरून जाते ढगांच्या गडगडाटसह पावसाच्या धारा जोरदारपणे उसळू लागतात, वीज हि चमकतात तलाव, नद्या, विहिरी ह्या पाण्याने तुडुंब भरू लागतात. गारव्यामुळे शरीर मन प्रसन्न होते.

ग्रीष्मातील उन्हाच्या कडाक्यामुळे शरीरात वाताच्या संचयामुळे कोरडेपणा आलेला असतो. या साठलेल्या वाताला वर्षा ऋतूतील ओलावा व गारठ्याचे सहकार्य मिळाल्याने तो प्रकोपित होतो. भूक मंदावल्यामुळे थोडा अशक्तपणा आलेला असतो. बाह्य सृष्टी अमलता वाढायला लागते व शरीरात हळूहळू पित्त देखील साठायला लागते.

मंदावलेली भूक, वाताचा प्रकोप आणि साठलेले पित्त ह्या शारीरिक अवस्था आणि बाहेर पडणाऱ्या पावसाच्या गारठ्याचा विचार वर्षा ऋतूतील आहार व विहार ठरवलेला आहे.

१. आहार

वर्षा ऋतूमध्ये अग्निमाद्य आणि अशक्तपणा आलेला असल्याने अग्निवर्धक, बळ देणारा व पचायला हलका आहार सेवन करावा.

आहारात एक वर्षापेक्षा जुना तांदूळ वापरावा. दूध-भात, वरण-भात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठलं, भाकरी, चपाती इत्यादी असावे, सालीच्या, ज्वारीच्या लाह्या, भाजलेला ब्रेड (टोस्ट) न्याहारीसाठी वापरावे. स्वयंपाकामध्ये सुंठ, आलं, मिरे, मोहरी, कोथिंबीर, धने, जिरे, हिंग, पुदिना या अग्निवर्धक मसाल्याचा वापर करावा. विशेषतः लसुणाचा उपयोग या ऋतूमध्ये अधिक कारण ती उष्ण, स्निग्ध, वातनाशक, अग्निवर्धक आहे फळ भाज्यांपैकी दुधी भोपळा, पडवळ, कोबी, भेंडी, दोडका, नवलकोल या सेवन कराव्यात. मूग, मसूर, मटकी वापरावे विशेषतः तेल व तुपाची फोडणी दिलेली आहार सेवन करावा. तेलाच्या फोडणीत हिंग, जिरे, मोहरी वापरावे तेल हे वातशामक आहे तर तूप हे अग्निवर्धक आहे म्हणून हे दोन्ही भरपूर प्रमाणात सेवन करावे.

अपश्य

नवीन धान्य वर्षा ऋतू मध्ये वापरू नये कारण ते पचायला जड असते त्यामध्ये क्लेदाचे प्रमाण अधिक असते पालेभाज्या पावसात खाऊ नयेत तसेच पचायला जड असा गोड आहार (पकवान) टाळावा तळलेले पदार्थ खाऊ नयेत. बेकरीचे आंबवलेले पदार्थ टाळावेत. दही खाऊ नये कारण ते अग्निमांद्यकर आहे.

पाणी हे निवळून, गाळून व नंतर उकळून घ्यावे. साधे पाणी न उकळलेले हे काही वेळेस साथीचे रोगांना आमंत्रण देणारे ठरते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी इतर साधनांचा जरी वापर केला तरी देखील ते उकळूनच घ्यावे पिण्यासाठी अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा स्नानापूर्वी अभ्यंग करावे व उदवर्तनासाठी उटण्याचा वापर करावा.

सातत्याने पावसाची शक्यता असल्याने बाहेर पडताना छत्री, रेनकोट गमबुट यांचा उपयोग करावा. पावसाळी कोंद टलेली हवा व वातावरण असल्यामुळे महत्त्वाचे कामे या ऋतूत टाळावेत. या वर्षा ऋतूत शिलता, वातप्रकोप असल्याकारणाने कपडे स्वच्छ, उबदार, इस्त्री केलेले, लोकरीचे वापरावेत.

या ऋतूमध्ये असे व्यायाम, साहस, दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे, पावसात भिजणे, अनवाणी फिरणे वर्ज्य करावे.

वर्षा ऋतु मध्ये होणारा वाताचा प्रकोप टाळण्यासाठी किंवा त्यामुळे व्याधीनिर्माण होऊ नये म्हणून वातशामक अशा तेलांचा (तीळ तेल) बस्ती वेद्याच्या सल्ल्याने घ्यावा.

वर्षा ऋतू मध्ये जोरदार वारे व गारठ्यामुळे श्वसन मार्गाचे रोग उत्पन्न होत असतात. विशिष्ट खोकला, सर्दी, पडसे, दमा, वात कफ ज्वर इत्यादी रोग या काळात वाढतात यासाठी सुंठवडा, आल्याचा रस + मध, बासा अवलेह इत्यादी औषधांचा प्रथमोपचार म्हणून उपयोग होतो.

शुद्ध ऋतुचर्या

ऋतू लक्षण

वर्षा ऋतू नंतर श्रावण व भाद्रपद या महिन्यात शरद ऋतू येतो सुरुवातीचे वातावरण वर्षा ऋतू प्रमाणेच असते ऊन पाऊसाचा खेळ सुरू असतो सगळीकडे गारठा व हिरवळ पसरलेली असते परंतु नंतर भाद्रपदामध्ये सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी भरपूर पाऊस पडायला लागतो. आकाश निरभ्र राहायला लागते व गारठा कमी होऊन सूर्य तापू लागतो. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे वर्षा ऋतूमध्ये साठलेले पित्त प्रकोप पावते त्यामुळे ते हवामान शरीरास सहन होत नाही. पित्तप्रकोपजन्य असे अर्श, अतिसार, अम्लपित्त, कामल, सर्दी व बेशुद्ध पडणे असे विकार वाढायला लागतात.साथीच्या स्वरूपात उदभवतात म्हणूनच शरद ऋतुचर्या ही उन्हाचा तडाखा ,असह्य उकाडा (ऑक्टोबर हिट), पाऊस,वाढलेली शरीराची ताकद, अग्निबळ, पित्त प्रकोप या सर्व मुद्द्यांचा विचार करून आचरणात आणावे.

१. आहार

या ऋतूमध्ये प्रामुख्याने पित्ताची वाढ होत असल्यामुळे आहारात गोड, कडू व तुरट या पित्तनाशक रसांचा समावेश करावा. सर्व प्रकारच्या फळभाज्या, कारले, दुधी भोपळा, पडवळ, हळद, कढीलिंब यांचा भरपूर वापर करावा तसेच मुग, मसूर, मटकी, हरभरा, मटार यांचा वापर करावा .

विसर्ग काळात वाढत जाणाऱ्या अग्नी बळासाठी बल्य आहार सेवन करावा. याच ऋतूमध्ये श्रावण भाद्रपदातील सणांसाठी डाळ, गुळ, गहू यांची “ पुरणपोळी” नित्य सेवन करावी, जोडीला भरपूर दूध आणि तुपाचा वापर करावा नारळी पौर्णिमेला खायाला सांगितलेला “नारळी भात” हा बळ देणारा व पित्तक आहे. नारळ हा मधुर, खंड आणि पित्तशामक आहे. याच काळात आल्याचा वापर करावा. आले हे तिखट असले तरी पित्तशामक, अग्निवर्धक आहे म्हणून आलं , ओली हळद आणि लिंबू याचं लोणचं सेवन करावे.

शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमेला बदाम, पिस्ता, व साखरेसह बनवलेल्या दुधाचं मिश्रण घ्यावं. दूध, तुपाची स्निग्धता, साखरेचा गोडवा बळ वाढवतो. हे दोन्ही ही पित्तशमन व विरेचन करतात.

अपश्य

शरद ऋतूतील महत्त्वाचे अ पश्य म्हणजे लसूण खावू नये तसेच तिखट, आंबट, खारट असे रसयुक्त पदार्थ टाळावेत. हिरवी मिरची, लाल मिरची, गरम मसाला, मसाल्यांचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ पूर्ण टाळावेत.

शरद ऋतूतील अगस्ती ताऱ्याच्या उदयामुळे पाणी शुद्ध, निर्मळ बनते. याला “हंसोदक” असे म्हटलेले आहे हे पाणी पिताना “वाळा सिद्ध” करून वापरावे. अंघोळीसाठी कोमट किंवा थंड पाणी घ्यावे.

उकाडा असल्याकारणाने पंखा, एअरकंडिशनर वापरावा शरीरावर चंदन, वाळा, कापूर यांचे उदवर्तन करणे तसेच पोहण्याचा व्यायाम करावा. कपडे सैलसर , नायलॉनचे वापरावे तसेच बाहेर चांदणे असल्याने रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंत बाहेर अंगणात झोपावे.

शरद ऋतुचर्या मध्ये अहितकर आहार विहार घडला तर विविध पित्त प्रकोप तसेच रक्तदुष्टीमन्य विकार होतात त्यासाठी मुख्यत:

१) विरेचन चिकित्सा - यासाठी त्रिफळ, मनुके, दूध यांचा मृदू विरेचक म्हणून वापर करावा.

२) रक्त मोक्षण - सिरानमधून रक्त काढून टाकावे यामुळे रक्त व पित्त दोन्हीची विकृती दूर होऊन स्वास्थ्य टिकून राहते.

हेमंत ऋतुचर्या

ऋतू लक्षण

वर्षा ऋतू पासून विसर्ग काळ सुरू होतो आणि हेमंत ऋतूमध्ये या विसर्ग काळाचा परमोच्च बिंदू असतो. अश्विन, कार्तिक महिन्यात सूर्याचे दक्षिणायन असल्याने तो दक्षिण गोलर्घात असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात असणाऱ्या भारतीय उपखंडात थंडी पडते. शरद ऋतूतील सूर्याची तीव्रता कमी होते. मंद सूर्यकिरणांसह या ऋतूत दिवस लहान व रात्र मोठी असते. एकूणच थंडीमुळे बाह्य वातावरण शीत व स्निग्ध गुणांची वाढ झाल्याने शरीर ही मृदू बनते.

विशिष्ट

विसर्ग काळातील वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप तर शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप असतो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराची निर्मिती होतेच परंतु हेमंत ऋतूमध्ये मात्र उत्कृष्ट शारीरिक व मानसिक बळ, उत्तम प्रदिप्त जाठराग्नी, दोषांची समस्थिती या कारणामुळे रोग निर्मिती होत नाही आणि म्हणूनच हेमंत व शिशिर हे दोन ऋतू आरोग्यदायी ठरतात व नेमके त्याच काळात सर्वत्र दीपावळी सारख्या मोठ्या सणाचे आयोजन लग्न समारंभ ठरवले जातात ते या कारणांसाठी.

१. आहार

हेमंत ऋतूतील थंडीमुळे त्वचेचा संकोच होतो गार वाऱ्यामुळे घाम येत नाही. त्यामुळे शरीर उष्मा कोंडतो यामुळे जाठराग्नी तले बळ मिळून ते प्रदीप्त होतो व खूप खूप वाढते म्हणूनच या ऋतुत मात्र गुळ (प्रमाणाने अधिक) व प्रकृती गुळ (पचायला जड) असा आहार घ्यावा

म्हणून मधुर, आम्ल, लवनरसात्मक द्रव्य तसेच तेल तूप इत्यादी स्नेह द्रव्यांचा भरपूर वापर करावा. गहू, उडीद, साखर, तुर, मूग, हरभरा, वाटाणा इत्यादी कडधान्य वापरावे याच ऋतूमध्ये येणाऱ्या दीपावली सणासाठी विविध गोड पकवाने बनवून खाल्ली जातात. तसेच इतर सर्व प्रकारची चमचमीत मसालेदार पकवान खावीत. बटाटा, रताळी, कंदमुळे,नवलकोल दोडका, पडवळ, वांगी, मुळा इत्यादी सर्व फळभाज्या व सर्व प्रकारचे मांसाहार सेवन करावा.

शाकाहारी व्यक्तींनी इतर आहारासोबत दूध, दही, लोणी, तूप, मलाई इत्यादी दुग्धजन्य पदार्थ खावेत तसेच सर्व प्रकारची फळे व सुकामेवा खावा या दिवसात नवीन धान्य ही पचते. हेमंत ऋतूत रात्र मोठी असल्यामुळे सकाळी भरपूर न्याहारी करावी एकूणच या काळात आहारावर कोणत्याही स्वरूपाचे बंधन नसते.

या ऋतूमध्ये पिण्यासाठी व स्नानासाठी गरम पाणी घ्यावे आहाराप्रमाणे पाण्यावरही बंधन नाही पिण्यासाठीचे पाणी नदी, तलाव, विहिरीचे असावे.

या ऋतूत पहाटे लवकर उठून शक्य होईल इतका व्यायाम करावा नंतर कोमट तेलाने अभ्यंग करावे त्यामुळे शरीर श्रम नाहीसे होतील.नंतर आवळा, चंदन इत्यादी चूर्ण चे उदवर्तन करावे. नंतर सुगंधी द्रव्ये घालून स्नान करावे उबदार, लोकरीचे कपडे स्वेटर, इत्यादी परिधान करावेत. दिवस निद्रा घेऊ नये. या दिवसात वैवाहिक सौख्य आपापल्या ताकदीनुसार घ्यावे.

जर प्रतिक्षायादी कफ साठल्यामुळे साधे साधे विकार जर निर्माण झाले तर त्यानुसार उपचार करावेत.

शिशिर ऋतुचर्या

ऋतू लक्षण

ढगाळ वातावरण, एखाद्या वेळेस पाऊस, जोरदार बोचरे थंडगार वारे अशी बाह्य परिस्थिती या ऋतूमध्ये असते. त्यामुळे थंडी वाटायला लागते. हेमंत ऋतू पेक्षा या ऋतूतील थंडी कडाक्याची असते. झाडांची पानगळ सुरू होते.

विशिष्ट

या ऋतुतील वाढलेल्या बोचऱ्या थंडीची शरीराला सवय नसते. ही थंडी असह्य असते. हेमंत ऋतू प्रमाणे उत्तम जाठरअग्नी, वाढलेले शरीर मानस बळ व उत्तम आरोग्य हीच एकंदर परिस्थिती पुढे कायम राहते. या ऋतूमध्ये अल्प प्रमाणात कफ संचय होतो. एकूणच उत्तम शरीर बळासह दोष सामन्यावस्थेत राहतात.

१. आहार

या ऋतूमध्ये थंडीमुळे आहार हा हेमंत ऋतू प्रमाणे ठेवावा. तो बळ वाढवणारा, स्निग्ध, पचायला जड असा असावा परंतु आहारामध्ये शीत गुणधर्माचे पदार्थ असू नयेत.

पौष महिना असल्याने उन्हात बसून न्याहारी करावी असे सांगतात गुळाची पोळी न्याहारीसाठी खावी ती बल्य, मधुर व उष्णता वाढवणारी आहे यासोबत भरपूर दूध व तूप घ्यावे आहारात सर्व मसाल्याचे पदार्थ सेवन करावेत कारण या ऋतूमध्ये सर्व उष्ण पदार्थ हे पथ्यकर आहेत म्हणून गुळपोळी, वांग्याचे भरीत, मुगाची खिचडी, सर्व प्रकारचे मासाहार इत्यादी उष्ण पदार्थ थंडी व शेत्य (शरीरातील गारवा) दूर करणारे पदार्थ खावेत. गहू व ज्वारीपेक्षा बाजरीचा भरपूर उपयोग करावा कारण ती उष्ण आहे फक्त उष्ण असल्याने बाजरीच्या भाकरीवर तीळ लावावेत व लोणी लावून खावी जेणेकरून शरीरात स्निग्धता टिकून राहील.

याच ऋतूमध्ये मकर संक्रांत येते पौष शुद्ध एकादशी सूर्य मकरवृत्ताकडून पुन्हा उत्तरेस सरकण्यास सुरुवात होते त्या दिवशी तिळगुळ चे आदान प्रदान करावे, दुसऱ्या दिवशी मांसाहार घ्यावा, घेतला जातो जेणेकरून बळ मिळावे एकूणच अग्नी प्रज्वलित असल्यामुळे सर्व प्रकारचे आहार या ऋतूमध्ये पचतो.

पाणी कोमट उकळून गार करून घ्यावे सुंठीसिद्ध व अन्य मसाला युक्त मंड, पेय यांचे सेवन करावे. आसवरिष्ठे सेवन करावे.

बाह्य वातावरणामध्ये कडक थंडीचा विचार करून दिनचर्या आखावी. हेमंत ऋतू प्रमाणे व्यायाम करून स्नहेन करावे. त्यानंतर उटण्याचे मसाज करून गरम पाण्याने स्नान करावे उबदार गरम लोकरीचे कपडे वापरावेत. उबदार वातावरणात राहण्यासाठी शेगडी, रूम हीटर वापरावे. थंडी खूप पडत असल्याने रात्री बाहेर पडू नये रात्री भरपूर निद्रा घ्यावी, दिवसा झोपू नये.

उत्तम जाठराग्नी मुळे या काळात आरोग्य टिकून राहते. सर्व मनुष्य प्राण्यांसाठी हा उत्तम स्वास्थ्याचा काळ असतो क्वचित प्रसंगी कफाचे विकार झाले तर होतात अन्य रोग कमी असतात.

वसंत ऋतुचर्या

ऋतू लक्षण

शिशिर ऋतू नंतर येणारा बसंत ऋतू म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात थंडी संपून हळूहळू उष्णता वाढायला लागते. त्यामुळे दिवस मोठा व रात्र लहान व्हायला लागते. आधीच्या ऋतुतील पानगळी मुळे वसंत ऋतूत सर्व वृक्ष हे पूर्णहीन असतात. परंतु कालांतराने उबदार हवामानामुळे नवीन पालवी फुटते. आंब्याला मोहर येऊन त्याचा सुगंध सर्वत्र दरवळायला लागतो. सर्व सृष्टी ही हिरवीगार, नवीन दिसते. या प्रसन्न वातावरणामुळे वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात.

शिशिरातील थंडी सुरुवातीला कमी झाल्यामुळे गारव्यामुळे थोडा उल्हास वाटायला लागतो. नंतर मात्र उन्हाची तीव्रता, उष्णता वाढायला लागते थंडीमध्ये साठलेला कफ हा हळूहळू पातळ व्हायला लागतो वसंत ऋतूतील उन्हामुळे कफ पातळ होवून अनेक कफाचे विकार निर्माण होतात. श्वास / दमा, खोकला, सर्दी, कफाचा ताप , श्वसन मार्गाचे आजार लहान व मोठ्यांना तसेच गोवर, कांजण्यांची साथ लहान मुलांमध्ये निर्माण व्हायला लागते.

एकूण निर्माण झालेली शारीरिक दुर्बलता, अग्निमाद्य ,कफवृद्धी अशी शारीरिक परिस्थिती असते वाढलेल्या उष्णतेमुळे आळस निर्माण होतो.

१. आहार

या ऋतूतील परिस्थिती पाहता पचायला हलका आहार घ्यावा हेमंत व शिशिर च्या नेमका उलटा आहार घ्यावा.

भाकरी, चपाती, गव्हाचे फुलके, खाकरा हे खावे भात कफवर्धक असल्यामुळे त्याचे सेवन कमी करावे. आहारासाठी जुने धान्य वापरावे. तिखट कडू व तिखट रस हे कफनाशक असल्याने त्याचे पदार्थ वापरावे. वांगी, कारली,मुळा, मेथी, तांदूळजा इत्यादी भाज्या खाव्यात. पदार्थ बनवण्यासाठी हिंग, मेथी, मोहरी, आले, जिरे, मिरे, दालचिनी, लवंग, लसूण इत्यादी सर्वच अग्निवर्धक मसाल्याचा वापर भरपूर करावा. तेलाचा वापर करावा. तुर, मुग, मसूर, हरभरा या डाळी वापराव्यात. विशेष करून हुळग्याचे ( कुळीथ ) उपयोग करावा. “ हुलगा“ हे धान्य उत्तम कफघ्न आणि कफरोगनाशक आहे. हुलग्यामुळे कफाचे रोग टाळता येतात आणि जर झालेच तर तोच औषध म्हणून उपयोगाला येतो.

आहारामध्ये खेकडा व मासे सोडून अन्य मांसाहार घ्यावा. एकूण वसंत ऋतूमध्ये हितभुक ( हित कर आहार घ्यावा) मीतभूक ( अल्प प्रमाणात आहार घ्यावा) असावे.

अपथ्य

कफाची वाढ करणारे असे नवीन धान्य, दूध, तूप, दही, दुधाचे व आंबवलेले पदार्थ, शीत , अतिस्निग्ध, गोड पदार्थ खाऊ नये पचायला जड, मिठाई सारखे पकवाने, आंबट व खारट रसाचे पदार्थ टाळावेत.

या ऋतूमध्ये जलाशयातील पाणी आटून दूषित होते. म्हणून ते उकळून गार करावे. सुंठ, अगंरु इत्यादी कफघ्न द्रव्य घालून घ्यावे. वसंताच्या शेवटी माठातील पाणी, उसाचा खंड रस घ्यावा.

या ऋतूमध्ये सकाळी गारवा असेपर्यंत कामाचा उत्साह राहतो या ऋतूत व्यायाम हा अर्धशक्ती करावा नंतर चंदन, अगरु या रुक्ष द्रव्यांनी उदवर्तन करून कोमट पाण्याने स्नान करावे. पोहणे टाळावे सुरुवातीच्या काळात शरीरात साक्षात वारा लागू देवू नये तसेच दुपारी/ दिवसा झोपणे टाळावे अन्यथा कफाचा प्रकोप होईल.

वसंत ऋतूतील कफाच्या प्रकोपामुळे पुढे कफविकार होऊ नयेत म्हणून “वमन” करावे हा आयुर्वेदातील औषध देवून उलटी करण्याचा चिकित्सा प्रयोग आहे. विविध प्रकारच्या नस्यांचा वापर करावा. सुंठ, वेखंड, इत्यादी चे नस्य करावे हे दोन्ही उपाय प्रतिबंधात्मक म्हणून जर योजले तर प्रतिबंधात्मक.

जर कफाचे विकार झालेच तर त्रिफळ, त्रिकटू, अडुळसा असा कफघ्नद्रव्यांचा उपयोग करावा सितोपलादि, त्रिभुवनकीर्ती इत्यादी औषधे तस वैद्यांच्या सल्ल्याने वापरावीत.

(वसंत ऋतू हा खरंतर “फसवा उन्हाळा” असतो उन्हाचा कडाका वाढला म्हणून उन्हाळ्याची / ग्रीष्म ऋतू प्रमाणे आहार विहारात बदल करू नयेत )

ग्रीष्म ऋतुचर्या

ऋतू लक्षण

ऋतू लक्षण -वसंत ऋतु चे वैभव पाहिल्यानंतर अतिशय कडाक्याच्या अशा ग्रीष्म ऋतूंची उन्हाळ्याची सुरुवात होते .या ऋतूमध्ये रात्र लहान व दिवस बराच मोठा असल्याने अधिक काळ सूर्यकिरणांचा प्रभाव राहतो सूर्याची किरणे सरळ लंब रूपाने भारतीय उपखंडात पडतात. त्यामुळे रखरखीत कडक उन्हाळा सुरू होतो. प्रखर सूर्यकिरणांमुळे सृष्टी भाजून निघते. वारा हा अल्प व थोडाफार जरी आला तरी गरम असह्य अशा स्वरूपाचा येतो सर्व तलाव ,नद्या आटतात.शिशिर ऋतू सुरू झालेल्या आदांकालातील हा शेवटचा ऋतू असल्यामुळे या ऋतूत शारीरिक बल सर्वात कमी असते.

प्रखर उष्णतेमुळे घाम येऊन शरीरातील उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे भूक व पचन मंदावते. या काळात सूर्याचे तेज अधिक नसल्याने भूमीवरील ओलावा व शरीरातील कफाचे प्रमाण कमी होत जाऊन वायू ची रुक्षता वाढायला लागते. त्यामुळे या ऋतूसाठी आदानकालातील कमी असलेले शारीरिक बल अग्नि मान्द्य वात संचिती यांचा विचार करून ऋतुचर्या ठरवावी लागते .

१. आहार

आहारात भाकरी पोळी भात अधिक प्रमाणात तेल तूप दूध ताक इत्यादीचा समावेश करावा. आहारात सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या खाव्यात. आहारात मधुर आंबट व खारट रसाचे पदार्थ खावे., रव्याची गव्हाची तांदळाची खीर खावी. दूध ताक दुधाचे पदार्थ खावेत. आंबट फळांपैकी कैरी कोकम आवळा इत्यादीचे सेवन करावे. कैरीचे लोणचे खावे हे पदार्थ आंबट रसामुळे शीत विर्यात्मक परंतु अग्निवर्धक आहे. कांदा हा थंड असल्यामुळे तो उष्णतेपासून संरक्षण मिळवून देतो. आंबवलेले पदार्थ सेवन करावे. मांसाहार यापैकी जलचर प्राण्यांचे मांस अल्प प्रमाणात खावे.

द्रव पदार्थ

ग्रीष्म ऋतूत द्रवाहार अधिक ठेवावा गूळ घालून कैरीचे पन्हे लिंबू कोकमचे सरबत लाह्यांची पेज इतर शीत आईस्क्रीम नाचणीची आंबील इत्यादी सेवन करावेत शीत तृप्ती कारक अशा गुणधर्मांचे हे द्रव्य पदार्थ शरीराची उष्णता व रुक्षता कमी करतात याच ऋतूमध्ये येणारी आंबे काकडी कलिंगड टरबूज द्राक्षे अशी रसाळ फळे खावीत.

अपष्य

कोरडा गरम उष्णता वाढवणारे असा आहार टाळावा जास्त मसाल्याचे पचायला जड बाजरीची भाकरी मांसाहार टाळावा.

उकळून थंड करून प्यावे माठातील फ्रिजमधील पाणी प्यावे हेच पाणी जर वाळा चंदन गुलाब कापूर यांनी युक्त असेल तर अतिशय उत्तम होय स्नानासाठी थंड पाणी घ्यावे या ऋतूत भरपूर पोहावे मृदू, सौम्य स्वरूपाचे अरिष्ठ अल्प प्रमाणात सेवन करावे असल्यास भरपूर पाणी घालून घ्यावे अन्यथा वर्ज करावे .

कडक उन्हाळ्यामुळे या ऋतूत सर्व कामे अशक्य बनतात शक्यतो सकाळच्या प्रहरात ती उरकावे सैल, सुती कपडे वापरावे शरीरावर चंदन, वाळा इत्यादी शीत द्रव्यांचा लेप लावावा या ऋतूमध्ये दिवसा घेतलेली निद्रा ही पध्यकर आहे रात्री मोकळ्या अंगणात, गच्चीवर निद्रा घ्यावी.

उष्णता वाढून दाह,मूर्च्छा,, रक्त पित्ता सारखे व्याधी निर्माण झाले तर शितोपचार करावे.

अतिसार साठी लंघन करावे. कुटच सुंठी सारखी द्रव्ये वापरावीत उलटी साठी लाह्यांची पेज प्यावी अग्निमांद्य शारीरिक दुर्बलतेमुळे या ऋतूत कोणत्याही प्रकारचे शुद्धी उपक्रम (पंचकर्म) ही निश्चित आहे.

अशाप्रकारे या सर्व सहा ऋतुतील परिचर्येचा बंधन म्हणून नव्हे तर नियम स्वास्थ्य उपक्रम म्हणून अवलंब केल्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राखणे सहज शक्य होईल! शुभं भवतु